Tirumala Fake Ghee : तिरुमला मंदिराच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये २४० कोटी रुपयांची फसवणूक !

केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात दिली माहिती

अमरावती (आंध्रप्रदेश) – तिरुमला तिरुपती मंदिरात लाडवाचा प्रसाद बनवण्यासाठी बनावट तूप वापरल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात सांगितले आहे की, भोलेबाबा डेअरीचे संचालक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी लाढवाचा प्रसाद बनवण्यासाठी ६० लाख किलो भेसळयुक्त तूप पुरवून २४० कोटी रुपयांची फसवणूक केली.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांच्या देखरेखीखाली विशेष अन्वेषण पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे. या पथकाने उच्च न्यायालयाला सांगितले की, खर्‍या गायीच्या तुपाऐवजी रसायने मिसळलेले पाम तेल तुपाच्या स्वरूपात पुरवले जात होते. उत्तराखंडमधून आणलेले हे बनावट तूप टँकरमध्ये भरून ए.आर्. डेअरी आणि वैष्णवी डेअरी यांच्याद्वारे मंदिरात नेले जात होते. कागदावर त्यांचा ‘अधिकृत कंत्राटदार’ म्हणून उल्लेख होता, तर भोलेबाबा डेअरी पडद्यामागे काम करत होती.

अनेक मंदिरांना पुरवले जात होते बनावट तूप !

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने उघड केले की, हे जाळे तिरुमलाच्या पलीकडे पसरले आहे. आंध्रप्रदेशातील ६ प्रमुख मंदिरांनाही असेच भेसळयुक्त तूप मिळत असे. यामध्ये कनिपकम, श्रीकलहस्ती, द्वारका तिरुमला, पेनुगंचिप्रोलु तिरुपथम्मा अम्मावरू मंदिर, श्रीशैलम आणि कनक दुर्गा मंदिर (विजयवाडा) यांचा समावेश आहे.

अन्वेषण पथकाने न्यायालयात दिलेली माहिती

१. ए.आर्. डेअरी आणि वैष्णवी डेअरी यांच्या संचालकांना बनावट तूप पुरवण्यात भोलेबाबा यांना साहाय्य केल्यासाठी प्रति किलो ३ रुपये दलाली मिळाल्याचा आरोप आहे.

२. चौकशीत असे दिसून आले की, भोलेबाबाचे संचालकही घोटाळ्याच्या काळात वैष्णवी डेअरीमध्ये संचालक म्हणून काम करत होते.

३. आरोपी आणि त्यांचे प्रतिनिधी साक्षीदारांना धमकावत होते. या संदर्भात अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

४. वाय.एस्.आर्. काँग्रेसच्या सरकारच्या काळात तूप पुरवठा निविदा मिळवण्यासाठी देवस्थानाच्या अधिकार्‍यांना लाच देण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच स्वाधीन रहाण्यासाठी संघटित व्हा !
  • आर्थिक फसवणूक करणार्‍यांनाही आता फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आवश्यक आहे, तरच देशातील भ्रष्टाचार थांबेल !