Trupti Desai On ShaniShinganapur : (म्हणे) ‘आधी लिंगभेद केला गेला, आता धर्मभेद केला जात आहे !’

  • ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांची गरळओक !

  • ‘शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट’ने कामावरून काढलेल्या ११४ मुसलमान कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याची मागणी !

अहिल्यानगर – शनिशिंगणापूर प्रकरणात आधी लिंगभेद केला गेला आणि आता धर्मभेद केला जात आहे. जे मुसलमान कर्मचारी आहेत, त्यांनी हिंदु धर्माच्या मंदिरामध्ये स्वच्छता करू नये, अशी मागणी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची होती. त्यामुळे विश्वस्त मंडळाने १६७ कर्मचार्‍यांना कामावरून काढले. त्यांपैकी ११४ कर्मचारी मुसलमान आहेत. त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले पाहिजे, अशी मागणी ‘भूमाता ब्रिगेड’ या संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली.

‘यासंदर्भात मी धर्मादाय आयुक्तांकडे देवस्थान ट्रस्टच्या विरोधात करणार तक्रार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही या संदर्भात लक्ष घालण्याचे सांगून ज्या कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे, त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे’, असेही त्यांनी सांगितले. (तृप्ती देसाई यांच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनांमागे निवळ प्रसिद्धी मिळवणे हाच उद्देश असल्याचे यापूर्वी अनेकदा उघड झाले आहे. हिंदु धर्माविषयी तीळमात्र ज्ञान न नसणार्‍या देसाईंनी त्यात नाक खुपसू नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

हिंदु धर्माविषयी तीळमात्र ज्ञान नसणार्‍या तृप्ती देसाई

देसाई पुढे म्हणाल्या की, ट्रस्टने दिलेले अनियमिततेचे कारण धादांत खोटे आहे. जर मुसलमान धर्मातील काही लोक शनिशिंगणापूर या ठिकाणी सेवा करत असतील, तर हे मोठे उदाहरण आहे. हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आहे. ‘मुसलमानांच्या दर्ग्यामध्ये हिंदु धर्माचे लोक घेतले जात नाहीत’, असे म्हणण्यापेक्षा ‘आमच्या हिंदु धर्माच्या मंदिरामध्ये सगळ्या धर्माच्या कर्मचार्‍यांना संधी दिली जाते’, अशी भूमिका घेणे आवश्यक आहे.

(ही भूमिका म्हणजे ‘सर्वसमावेशकते’च्या नावाखाली हिंदु धर्माची केलेली गळचेपीच आहे. मग दर्ग्यामध्ये हिंदु धर्मियांना का घेतले जात नाही ?, याचेही उत्तर देसाईंनी द्यावे. दर्ग्यामध्येही समानतेचा आग्रह धरावा, तसेच मशिदीत महिलांना प्रवेश मिळवून दाखवावा ! – संपादक)


काय आहे प्रकरण?

‘शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट’मध्ये नोकरीला असणार्‍या मुसलमान कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यासाठी ‘भाजप आध्यात्मिक आघाडी’ आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे आघाडीवर होते. शेवटी देवस्थान ट्रस्टने ११४ मुसलमान कर्मचार्‍यांसह १६७ कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले.

संपादकीय भूमिका

  • तृप्ती देसाई यांनी कधी ‘मुसलमानांच्या दर्ग्यात किंवा चर्चमध्ये इतर धर्मियांची नियुक्ती करावी’, याविषयी आवाज उठवलेला नाही. मग हिंदु धर्माच्या मंदिरांसंदर्भातच ही बळजोरी का ?
  • धर्माविषयी काडीचेही ज्ञान आणि श्रद्धा नसणार्‍यांना अशी मागणी करण्याचा काय अधिकार आहे ?