तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !

  • मेजवानीतील १५६ जणांची चौकशी

  • अमली पदार्थांचा वापर झाल्याची शक्यता

प्रतिकात्मक छायाचित्र

आळंदी (पुणे) – आळंदी-मरकळ मार्गावरील तुळापूर परिसरात नदी किनारी असलेल्या ‘विश्वसंस्कृती’ या खासगी इमारतीत अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मेजवानीवर (पार्टीवर) पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने ७ जनूच्या पहाटे धाड घातली. यातील १५६ जणांची चौकशी करण्यात येत आहे. या धाडीमध्ये उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींची चौकशी करण्यात आली. मद्य, गांजा, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स (रंग), मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला.

१. मेजवानीमध्ये एकूण १०७ पुरुष आणि ४९ महिला, असे १५६ जण आढळून आले. त्यातील ३ व्यक्तींचे वय २१ वर्षांपेक्षा अल्प होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या अधिक आहे. (मेजवानीसाठी तरुणांचा सहभाग असणे, हे तरुणांवर नैतिकेचे संस्कार नसल्याचे द्योतक ! – संपादक)

२. काही प्रमाणात गांजा, ३ हुक्क्यांसह १० प्रतिबंधित ‘फ्लेवर्स’ जप्त केले. ९ लाख २२ सहस्र रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचे मूल्य अनुमाने ८५ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

३. या मेजवानीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय असून जप्त केलेले नमुने पुढील पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

तरुणांचे मनोबल दिवसेंदिवस दुर्बल होत असल्याचा परिणाम ! तरुणांना व्यसनाच्या आहारी न जाण्यासाठी त्यांना धर्मशक्षण देणे आवश्यक !