नाशिक – आगामी ‘त्र्यंबकेश्वर–नाशिक सिंहस्थ कुंभपर्व २०२७’च्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने नाशिक महापालिका क्षेत्रातील ‘साधूग्राम’ प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या १९१.२१ एकर भूमीच्या भूसंपादनासाठी २ सहस्र २६७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. नाशिक महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार साधूग्राम प्रकल्पासाठी एकूण ३७७ एकर क्षेत्र आरक्षित आहे. कुंभपर्वाच्या काळात देश–विदेशातून लक्षावधी भाविक, साधक, पर्यटक आणि विविध आखाड्यांचे साधू–महंत नाशिकनगरीत येतात. त्यांचा तात्पुरता निवास, भोजन आणि धार्मिक विधी यांच्यासाठी तपोवन परिसरात साधूग्रामची उभारणी केली जाते.