थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६

बँक कर्मचार्‍याकडूनच अफरातफर

मुंबई – खातेदारांच्या मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट) तारण ठेवून त्यावर ४१ लाख रुपयांचे कर्ज काढून त्यांतील २५ लाखांचा अपहार जी.एस्. सहकारी बँकेतील कनिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर घोगरे यांनी केला आहे. लालबाग, मुंबई येथील शाखेत हा प्रकार घडला. (कुुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – संपादक) पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. महाराष्ट्रात या अधिकोषाच्या ७० शाखा आहेत.


मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण !

मुंबई –  मुंबई-गोवा महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. संगमेश्वरजवळचे ४ कि.मी.चे काम झाल्यावर या रस्त्याचे काम पूर्ण होईल. ‘पुढारी’ वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संपादकीय भूमिका : काम पूर्ण झाले, तरी रस्त्याचा अपेक्षित असा दर्जा का नाही ?


मेळघाटातील साडी जागतिक स्तरावर !

अमरावती – मेळघाटातील आदिवासी आणि ग्रामीण महिलांनी ‘महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळा’च्या साहाय्याने निर्माण केलेल्या ‘कुटीर’ नावाच्या साड्यांनी जागतिक स्तरावर प्रभाव पाडला आहे. देहली येथील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य आणि नैसर्गिक जीवनशैली प्रचारक बार्बरा ओनील यांनी या साडीचे पुष्कळ कौतुक करून मुंबई येथील कार्यक्रमात तीच साडी परिधान करून उपस्थितांना संबोधित केले.