सध्याच्या डिजिटल युगात अन्नपदार्थांपासून कपड्यांपर्यंत सर्व काही एका ‘क्लिक’वर उपलब्ध होत असतांना औषधांची बाजारपेठही ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स’ने व्यापली आहे. ग्राहकांसाठी घरबसल्या ५० टक्के सवलतीत औषधे मिळणे अत्यंत आकर्षक वाटत असले, तरी या चमकत्या पडद्यामागे एक अत्यंत गंभीर वास्तव दडलेले आहे. हे वास्तव, म्हणजे वाढत्या ऑनलाईन औषध विक्रीमुळे छोट्या औषध विक्रेत्या दुकानदारांच्या अस्तित्वाला लागलेला सुरुंग आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे रुग्णांच्या सुरक्षिततेशी होणारी तडजोड ! म्हणून काही दिवसांपूर्वी राज्यातील औषध विक्रेत्या मालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता; पण सरकारशी झालेल्या चर्चेनंतर तो तूर्तास स्थगित झाला आहे. असे असले, तरी या निमित्ताने ऑनलाईन औषध विक्रीवर विचारमंथन होणे आवश्यक आहे. त्याविषयी औषध विक्रेत्या दुकानदारांचे काय म्हणणे आहे ? त्यांचा यावर काय अभ्यास आहे ? हे येथे देत आहोत.

१. औषध विक्रेता आरोग्यव्यवस्थेतील जनसामान्यांचा आधार
एक काळ होता जेव्हा प्रत्येक गल्लीबोळातील औषध विक्रेता दुकानदार (मेडिकल शॉप) हा केवळ एक व्यापारी नव्हता, तर त्या भागासाठी विश्वासाचे ठिकाण असायचा. रात्री-अपरात्री मुलाला आलेला ताप असो वा रक्तदाबाची (‘ब्लड प्रेशर’ची) तातडीची गोळी असो किंवा डॉक्टरांच्या अवघड हस्ताक्षरातील ‘प्रिस्क्रिप्शन’ (औषधांची चिठ्ठी) समजावून सांगणारा आधार, हा औषध विक्रेता आरोग्यव्यवस्थेतील शांतपणे काम करणारा सैनिक होता. कोरोना महामारीच्या भीषण काळात जेव्हा संपूर्ण देश घरात बंदिस्त होता, भीतीचे सावट होते, तेव्हा याच औषध विक्रेत्या दुकानदारांचे दिवे रात्रंदिवस चालू होते. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सहस्रो दुकानदार लोकांपर्यंत औषधे पोचवत होते. समाजाने त्यांना ‘फ्रंटलाईन वॉरियर्स’ (आघाडीचे योद्धा) म्हणून गौरवले; मात्र आज तोच दुकानदार मोठ्या ‘कॉर्पोरेट कंपन्यां’च्या (व्यावसायिक आस्थापनांच्या) भांडवलशक्ती, विज्ञापने आणि आक्रमक ‘मार्केटिंग’च्या (विपणनाच्या) गर्तेत स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे, हे निश्चितच विचार करायला लावणारे आहे.
२. औषध ही ‘वस्तू’ नाही, तो उपचार !

ऑनलाईन कंपन्यांच्या ‘बाय वन, गेट वन’ (एक वस्तू खरेदी करा आणि एक वस्तू विनामूल्य मिळवा) किंवा ‘भारी डिस्काऊंट’ (सवलत)च्या युगात आपण हे विसरत चाललो आहोत की, औषध ही चैनीची किंवा सामान्य वापराची वस्तू नाही. औषध, म्हणजे थेट जिवाशी जोडलेला उपचार आहे. आजकाल ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धीमत्तेच्या) साहाय्याने खोटे ‘प्रिस्क्रिप्शन’ सिद्ध करून औषधे मागवली जाण्याची भीती वाढली आहे. औषध विक्रीच्या दुकानात उभा असलेला ‘फार्मासिस्ट’ (औषध विक्रेता) हा केवळ गोळ्या देणारा माणूस नसतो, तर तो रुग्ण आणि औषध यांच्यामधील सुरक्षा कवच असतो. ‘ऑनलाईन’ विक्री आणि वितरण करण्यामध्ये हा मानवी अन् तांत्रिक सल्ला पूर्णपणे गायब असतो. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना ‘ऑनलाईन ॲप्स’वरून झोपेच्या गोळ्या, मानसिक ताण न्यून करणारी औषधे आणि वेदनाशामक गोळ्या सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
३. ‘अँटिबायोटिक्स’चा (प्रतिजैविकांचा) ऑनलाईन सुळसुळाट
या सगळ्या प्रकारात सर्वांत मोठा धोका आहे तो, म्हणजे ‘अँटिबायोटिक्स’चा अनियंत्रित वापर. आज ताप किंवा सर्दी झाली की, लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता ऑनलाईन औषधे मागवतात. यामुळे ‘अँटिमायक्रोबिअल रेझिस्टन्स’, म्हणजेच ‘औषध प्रतिकारशक्ती’ वेगाने वाढते आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर भविष्यात गंभीर आजारांवर सध्याची औषधे काम करणे बंद करू शकतात. आज आपण सवलतीत औषधे घेत आहोत; पण उद्या कदाचित् औषधे असूनही शरिरावर उपचार होणार नाहीत, अशी भीती आरोग्यतज्ञ व्यक्त करत आहेत.
४. संवादाची आवश्यकता
डिजिटल सुविधा आणि तंत्रज्ञान पूर्णपणे थांबवणे अशक्य अन् अयोग्य आहे; पण प्रश्न ‘सुविधा विरुद्ध परंपरा’ असा नसून ‘रुग्णांची सुरक्षा कोण घेणार ?’, हा आहे. ही लढाई असमान स्पर्धेविरुद्धची आहे, जिथे एका बाजूला अब्जावधींचे भांडवल आहे आणि दुसर्या बाजूला गावागावांत प्रामाणिकपणे सेवा देणारा छोटा व्यावसायिक. सरकारने औषध विक्रेत्या मालकांच्या मागण्यांकडे केवळ ‘व्यापारी मागण्या’ म्हणून न पहाता आरोग्यव्यवस्थेच्या व्यापक संदर्भात पहायला हवे. ऑनलाईन औषध विक्रीवर कडक नियमावली, ‘फार्मासिस्ट’चे अनिवार्य प्रमाणीकरण आणि ‘प्रिस्क्रिप्शन’ची कडक पडताळणी होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान स्वीकारतांना मानवी मूल्ये, सुरक्षितता आणि उत्तरदायित्व जपणे, हीच काळाची आवश्यकता आहे.
– श्री. नित्यानंद भिसे, पनवेल
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’)
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !