आतंकवादाचे अदृश्य जाळे : ‘स्लीपर सेल्स’मुळे (छुप्या गटांमुळे) देशांतर्गत सुरक्षेला धोका !

पडघा (जिल्हा ठाणे) येथे नुकतीच उघडकीस आलेली घटना म्हणजे पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, हे आता निश्चित झाले आहे. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश येथून बळ मिळते, हे नवीन नाही. त्यामुळे अशा देशविघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता अधिक तीव्र झाली आहे.

१. पडघ्यामध्ये आतंकवादी कारवायांचे छुपे जाळे सापडणे, ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर चेतावणी

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण आणि मीरा-भाईंदर यांसारख्या उपनगरांत, विशेषत: मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये आतंकवादी कारवायांचे छुपे जाळे विस्तारत असल्याचे धक्कादायक वास्तव वर्ष २०२३ आणि आता पुन्हा वर्ष २०२५ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या कारवायांतून समोर आले आहे. पडघा येथील बोरिवली गावात केलेल्या कारवाईत २० संशयितांना कह्यात घेण्यात आले. यांपैकी अनेक जण साकिब नाचन या पूर्वीच्या ‘सिमी’ या आतंकवादी आणि ‘इस्लामिक स्टेट’शी संबंधित व्यक्तीशी संपर्कात असल्याचे अन्वेषणात उघड झाले. याकडे ‘केवळ पोलिसांची एक कारवाई’ असे न पहाता भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठीची ही गंभीर चेतावणी म्हणून पहायला हवे.

आतंकवादी साकिब नाचन आणि ‘इस्लामिक स्टेट’

२. ‘स्लीपर सेल्स’ची धोकादायक कार्यपद्धत

देशात कार्यरत असलेल्या या ‘स्लीपर सेल्स’ची कार्यपद्धत अत्यंत धोकादायक आहे. धार्मिक गटांमध्ये तिरस्कारयुक्त प्रचार, कट्टर इस्लामी शिकवण, सामाजिक माध्यमांवरून ‘इसिस’सारख्या संघटनांचे उदात्तीकरण आणि तरुणांना ‘दार-उल्-इस्लाम’साठी (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) ‘हिजरत’ (स्थलांतर) करण्याचे आवाहन, अशा पद्धतीने युवकांचे पद्धतशीरपणे ‘ब्रेन वॉशिंग’ (बुद्धीभेद) केले जात आहे. साकिबसारखे देशद्रोही ‘अल-शाम’ या नावाने स्वतंत्र इस्लामी राज्य उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. युवकांना बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या संपर्कात आणून त्यांच्या साहाय्याने खोटी कागदपत्रे सिद्ध केली जातात. यानंतर ही मंडळी भारतात सहजतेने रहातात, काम करतात, काहींनी तर शिक्षण आणि व्यवसाय यांच्या माध्यमातून समाजात खोलवर प्रवेशही केला आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

३. पुनरुत्थान आणि आंतरराष्ट्रीय संबंध

पडघा, मुंब्रा, मालेगाव, संभाजीनगर, जळगाव या ठिकाणी ‘स्लीपर सेल्स’ असण्याचे गंभीर संकेत यापूर्वीही मिळाले आहेत. वर्ष २०२३ मध्ये मुंबई आतंकवादविरोधी पथकाने याच भागात ‘इसिस’शी संबंधित ‘मॉड्यूल’ उघडकीस आणले होते. वर्ष २०२५ मधील कारवाईने हेच पुन्हा अधोरेखित झाले आहे; म्हणूनच ही कारवाई म्हणजे आतंकवादी जाळे पुन्हा बळकट होत असल्याचे धोकादायक संकेत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. ‘जैश-ए-महंमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ या पाकपुरस्कृत संघटनांनी बांगलादेशातील कट्टरपंथीय गटांशी हातमिळवणी करून भारतीय मुसलमान तरुणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काही बांगलादेशी विद्यापिठांमधून अशा कट्टर विचारांचा प्रचार होत आहे. त्यातून भारतातील शहरे, विशेषत: सीमावर्ती राज्ये अन् महाराष्ट्रातील गावे यांना लक्ष्य केले जात आहेत.

४. आवश्यक उपाययोजना आणि ‘स्लीपर सेल’ची संकल्पना

याला रोखण्यासाठी केवळ आतंकवादविरोधी पथकच नव्हे, तर स्थानिक पोलीस, गुप्तचर (इंटेलिजन्स) आणि सायबर सेल यांचा समन्वय असलेली सुसज्ज माहिती संकलन यंत्रणा विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात येत असली, तरी या कारवाईला गती द्यायला हवी. त्यांच्याकडे सरकारी कागदपत्रे कुठून आली, याचे सखोल अन्वेषण होणेही आवश्यक आहे. ही कागदपत्रे बनवून देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे. घुसखोरांना निवास आणि रोजगार देणार्‍यांना कठोर कारावासाची शिक्षा आवश्यक आहे. महाविद्यालये, मदरसे आणि काही स्वयंसेवी संस्था यांद्वारे जे ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) होत आहे, त्याचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे. मुसलमान समाजातही धर्मांधांविरोधात एकमत होणे तितकेच महत्त्वाचे आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या मूल्याचा प्रचार करणे, हे प्रशासन आणि माध्यमे यांचेही उत्तरदायित्व आहे.

भिवंडी-पडघ्याच्या घटनांनी ‘आपण ‘सुरक्षित’ आहोत’, या समजुतीवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘भारतात ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून आपल्याच अंगणात एका मोठ्या युद्धाची पूर्वसिद्धता चालू आहे’, असे निश्चितपणे म्हणता येते. ती थांबवण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत, तर ही आग संपूर्ण राष्ट्राला ग्रासू शकते. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्र मिळून ही छुपी लढाई निर्णायकपणे थांबवायला हवी. या घडामोडींतून उलगडणारी मोठी आंतरराष्ट्रीय साखळी आपल्या लक्षात आली पाहिजे. देशभरात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे देशद्रोही मोठ्या प्रमाणात पकडले जात आहेत. ‘स्लीपर सेल’ म्हणजे काय ?, हे समजून घेतले पाहिजे. ‘स्लीपर सेल’, म्हणजे अशा व्यक्ती ज्या दीर्घकाळ सर्वसामान्यांसारख्याच रहातात. योग्य क्षणी सक्रीय होऊन गुप्तचर, आतंकवादी किंवा विध्वंसक कार्यांमध्ये त्या सहभागी होतात. त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना स्थानिक पातळीवर सतर्कता बाळगावी लागणार आहे. त्याच वेळी समाजमाध्यमांवरील ‘डार्क नेटवर्क्स’वर लक्ष ठेवण्याचीही सर्वाधिक आवश्यकता आहे.

आज जे काही उघडकीस येत आहे, ते केवळ हिमनगाचे टोक असून ‘त्यांच्या मागे संगणकीकृत, धार्मिक कट्टरवादाने प्रेरित आणि रणनीतीपूर्वक विकसित केलेले ‘स्लीपर नेटवर्क’ कार्यरत आहे’, हे लक्षात घेऊनच पुढील धोरण आखणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय मुसलमान तरुणांपर्यंत पोचणार्‍या विचारधारेचे केंद्र आता केवळ पाकिस्तानपुरते मर्यादित राहिलेले नाही. सक्रीयता आणि उपयुक्तता ओळखून तरुणांना ‘स्लीपर सेल्स’ म्हणून सिद्ध केले जात आहे. मुंबई, पडघा, मालेगाव अशा ठिकाणी उघडकीस आलेले जाळे सीमेपलीकडून प्रायोजित ‘हायब्रीड वॉरफेअर’चा परिणाम आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (५.६.२०२५)