राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग अन् त्यांचे विश्लेषण !

‘भारत ही संतांची भूमी आहे. ‘अध्यात्मज्ञान’ हे भारताचे सर्वाेत्तम वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी लोकांना ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवले. त्यांपैकी काही संतांनी अध्यात्मप्रसाराच्या कार्यासमवेत राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचेही महान कार्य केले. गेल्या ४०० वर्षांचा विचार केल्यास १७ व्या शतकात समर्थ रामदासस्वामी, १९ व्या शतकात स्वामी विवेकानंद आणि २० व्या शतकात महर्षि अरविंद या संतांनी लोकांना साधना शिकवण्यासह राष्ट्र-धर्मरक्षणाचे मोठे कार्य केले. या संतांप्रमाणेच सध्याच्या २१ व्या शतकात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे राष्ट्र-धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. या ४ संतांच्या जन्मकुंडल्यांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या जन्मकुंडल्यांतील अनेक ग्रहयोगांमध्ये साम्य असल्याचे आम्हाला आढळले. ४ संतांच्या जन्मकुंडल्यांतील ग्रहयोगांचे विश्लेषण पुढील लेखात केले आहे, ११ मे या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये या लेखाचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता. आज त्यापुढील भाग देत आहोत.

(भाग २)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/912409.html

१ इ. वैराग्य आणि समर्पण

कुंडलीत ‘बुध’ आणि ‘शुक्र’ या भौतिक प्रवृत्तीच्या ग्रहांचा ‘गुरु’, ‘शनि’ आणि ‘केतू’ या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या ग्रहांसोबत शुभयोग असणे; बुध आणि शुक्र हे ग्रह आध्यात्मिक स्थानांमध्ये किंवा आध्यात्मिक राशींमध्ये असणे इत्यादी योग व्यक्तीमध्ये वैराग्य आणि समर्पण ही आध्यात्मिक वैशिष्ट्ये दर्शवतात.

१ इ १. समर्थ रामदासस्वामी

१ इ १ अ. समाजाला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आयुष्य समर्पित करणे : समर्थ रामदासस्वामी यांच्या कुंडलीत ‘शुक्र’ आणि ‘केतू’ यांची युती आहे, तसेच ‘बुध’ आणि ‘शनि’ यांच्यात योग आहे. या युती आणि हे योग वैराग्य आणि समर्पण दर्शवतात. समर्थांच्या अंगी तीव्र वैराग्य होते. समर्थांना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले आणि समाजाची स्थिती जाणून घेतली. त्या कालावधीत त्यांनी इस्लामी आक्रमणांमुळे समाजाची झालेली दुरावस्था जवळून पाहिली आणि समाजाला पुन्हा शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनवण्याचा संकल्प केला.

१ इ २. स्वामी विवेकानंद

१ इ २ अ. युवावस्थेत संन्यास घेऊन राष्ट्राला भौतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त बनवण्याचा संकल्प करणे : स्वामी विवेकानंद यांच्या कुंडलीत ‘बुध’ आणि ‘शुक्र’ यांचा अनुक्रमे ‘शनि’ आणि ‘केतू’ या ग्रहांशी शुभयोग आहे. हा योग मायेपासून अलिप्तता, विवेक आणि त्यागी वृत्ती देतो. स्वामी विवेकानंद यांना श्री रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अनेक आध्यात्मिक अनुभूती आल्या. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या देहत्यागानंतर स्वामी विवेकानंद यांनी संन्यास घेतला. त्या वेळी त्यांचे वय केवळ २३ वर्षे होते. नंतर त्यांनी ५ वर्षे संपूर्ण भारतात प्रवास करून समाजाची स्थिती जाणून घेतली. दुःखी आणि पीडित जनतेची स्थिती पाहून त्यांनी राष्ट्राला पुन्हा भौतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सशक्त बनवण्याचा संकल्प केला.

१ इ ३. महर्षि अरविंद

१ इ ३ अ. भविष्यातील भौतिकदृष्ट्या उज्ज्वल आणि सुखसुविधांनी युक्त असे जीवन त्यागून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे : महर्षि अरविंद यांच्या कुंडलीत ‘बुध’ आणि ‘शनि’ यांच्यात शुभयोग आहे, तसेच शनि ग्रह ‘षष्ठ’ (सेवा) स्थानात आहे. हे योग वैराग्य आणि समर्पण दर्शवतात. अत्यंत बुद्धीमान असलेले महर्षि अरविंद यांचे शिक्षण आणि संगोपन इंग्लंडमध्ये झाले होते. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून त्याकाळची प्रतिष्ठेची ‘Indian Civil Service’ ही परीक्षा दिली होती आणि त्यात ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे ते भौतिकदृष्ट्या उज्ज्वल आणि सुखसुविधांनी युक्त असे जीवन जगू शकले असते; पण महर्षि अरविंद यांना त्या कशाचीही ओढ नव्हती. त्यांना पारतंत्र्यात असलेली आपली मातृभूमी खुणावत होती. त्यामुळे ते स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी भारतात परतले. त्यांनी भारतात काही वर्षे प्रभावी स्वातंत्र्यकार्य केले. पुढे कारागृहात त्यांना दिव्य अनुभूती आल्यानंतर त्यांनी पुढील जीवन भारताला आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत बनवण्यासाठी समर्पित केले.

१ इ ४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१ इ ४ अ. गुरुकृपा आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य यांसाठी सर्वस्वाचा त्याग करणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कुंडलीत ‘बुध’ आणि ‘शनि’ यांची १२ व्या (मोक्ष) स्थानात युती आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव प्रथमपासूनच विरक्त वृत्तीचे होते. ‘तन, मन आणि धन अर्पण केल्यानंतरच गुरु शिष्याला जवळ करतात’, हे लक्षात आल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गुरूंच्या आश्रमात सर्व प्रकारच्या शारीरिक सेवा केल्या; मनातून अखंड नामस्मरण केले आणि स्वतःचे धन अन् चिकित्सालय गुरूंना अर्पण केले. त्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपा झाली.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना ‘अध्यात्माचे महत्त्व समाजातील सर्वांपर्यंत पोचावे’, अशी तळमळ होती अन् तशी गुरूंचीही आज्ञा होती. अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःच्या रहात्या घरात अध्यात्मासंबंधी अभ्यासवर्ग चालू केले, तसेच घराला सेवाकेंद्र बनवले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी त्यांचे घर, चिकित्सालय, व्यवसाय, धन, सामाजिक प्रतिष्ठा आदी सर्वांचा त्याग करून अध्यात्मप्रसाराच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

२. समष्टी कार्य दर्शवणारे जन्मकुंडल्यांतील योग !

२ अ. आध्यात्मिक कार्य : कुंडलीतील ‘रवि’, ‘बुध’, ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांचे एकमेकांशी महत्त्वाचे शुभयोग असणे, हे शुभयोग आध्यात्मिक स्थानांमध्ये किंवा आध्यात्मिक राशींमध्ये असणे इत्यादी ग्रहयोग तत्त्वज्ञान, आध्यात्मिक लिखाण, साधनेची शिकवण आदी आध्यात्मिक कार्य दर्शवतात. ‘समाजाला अध्यात्माची शिकवण देणे’ ही मानवजातीची सर्वाेत्तम सेवा आहे. अध्यात्मामुळेच मनुष्याला जीवनाची सार्थकता कळते आणि ती साध्य करण्यासाठी तो प्रयत्न करतो.

२ अ १. समर्थ रामदासस्वामी

२ अ १ अ. आध्यात्मिक वाङ्मयाची निर्मिती करणे, तसेच अध्यात्मप्रसारासाठी संप्रदायाची स्थापना करणे : समर्थ रामदासस्वामी यांच्या कुंडलीत ‘रवि’, ‘बुध’ आणि ‘गुरु’ यांची दशम (कर्म) स्थानात युती आहे, तसेच त्यांचा ‘शनि’ ग्रहाशी योग आहे. हा योग तत्त्वज्ञान, आध्यात्मिक लिखाण आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य दर्शवतो. समर्थांनी भारतभर भ्रमण करून लोकांना श्रीरामभक्तीचा उपदेश केला. त्यांनी ‘श्रीमद् दासबोध’, ‘आत्माराम’, ‘मनाचे श्लोक’, ‘षड्रिपू-निरूपण’ इत्यादी आध्यात्मिक वाङ्मयाची निर्मिती केली. त्यांच्या वाङ्मयाद्वारे साधकाला स्वतःतील दोषांचे निर्मूलन करून सदाचरण करण्याविषयी मार्गदर्शन मिळते. त्यांनी अनेक आरत्या, स्तोत्रे आदींची रचना केली. समर्थांनी अध्यात्मप्रसारासाठी ‘समर्थ संप्रदाया’ची स्थापना केली. त्यांनी भारतभरात ७०० हून अधिक ठिकाणी मठांची स्थापना केली. आजही ‘समर्थ संप्रदाय’ अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे.

२ अ २. स्वामी विवेकानंद

श्री. राज कर्वे

२ अ २ अ. आधुनिक शैलीत अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणे आणि अध्यात्मावर विपुल लेखन करणे : स्वामी विवेकानंद यांच्या कुंडलीत ‘रवि’ आणि ‘गुरु’, तसेच ‘बुध’ आणि ‘शनि’ यांच्यात शुभयोग आहेत. हे योग ज्ञानशक्ती, सखोल चिंतन, तत्त्वज्ञानी विचार, आध्यात्मिक लिखाण आणि अध्यात्मप्रसार हे परिणाम दर्शवतात. स्वामी विवेकानंद यांनी आधुनिक शैलीत अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. ‘प्रत्येक प्राणीमात्रात एकच ईश्वरी तत्त्व स्थित आहे. हे सुप्त ईश्वरी तत्त्व प्रकट करणे, हेच आपले ध्येय आहे; हाच खरा धर्म आहे’, असे सांगून त्यांनी विश्व-एकात्मतेचा संदेश दिला. त्यांनी अध्यात्मावर विपुल लेखन केले; त्यांपैकी त्यांचे ‘राजयोग’, ‘ज्ञानयोग’, ‘भक्तीयोग’, ‘कर्मयोग’ इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी अध्यात्मप्रसारासाठी ‘रामकृष्ण मठा’ची स्थापना केली. आजही ‘रामकृष्ण मठ’ या संस्थेच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार आणि समाजप्रबोधन यांचे कार्य होत आहे.

२ अ ३. महर्षि अरविंद

२ अ ३ अ. विश्वाच्या अस्तित्वाचे रहस्य उलगडणारे मौलिक वाङ्मय निर्माण करणे, तसेच ‘आंतरिक योग’ ही साधनापद्धत विकसित करणे : महर्षि अरविंद यांच्या कुंडलीत ‘रवि’, ‘गुरु’ आणि ‘हर्षल’ यांच्यात युती आहे, तसेच ‘बुध’ आणि ‘शनि’ यांच्यात शुभयोग आहे. हे योग चिंतनशीलता, तत्त्वज्ञानी विचार, आध्यात्मिक लिखाण आणि अध्यात्मप्रसार हे परिणाम दर्शवतात. महर्षि अरविंद इंग्रजांच्या कारावासातून सुटल्यानंतर पुदुचेरी (पाँडिचेरी) येथे आले. तेथे त्यांनी ‘आर्या’ नामक अध्यात्मावरील नियतकालिक चालू केले. त्यात त्यांनी ‘ईश्वराचे स्वरूप काय ? विश्व अस्तित्वात का आणि कसे आले ? विश्वात मानवाचे प्रयोजन काय ? विश्व चेतनेच्या स्तरावर कसे विकसित होते ?’ इत्यादी मूलभूत प्रश्नांसंबंधी विपुल लेखन केले. त्यांचे ‘दिव्य जीवन’, ‘योग-समन्वय’, ‘योगाची मूलतत्त्वे’, ‘गीता-प्रबंध’, ‘वेद-रहस्य’ इत्यादी ग्रंथ मौलिक आहेत. ‘ईश्वराच्या दिव्य चेतनेने मनुष्याच्या माध्यमातून कार्य केल्यास पृथ्वीवर दिव्य जीवन अवतरील’, असा सिद्धांत त्यांनी मांडला. हे ध्येय साध्य करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी ‘आंतरिक योग’ असे नाव दिले. महर्षींनी पुदुचेरी (पाँडिचेरी) येथे मोठा आश्रम निर्माण केला.

२ अ ४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२ अ ४ अ. काळानुसार योग्य असलेली साधना प्रायोगिक स्तरावर शिकवणे, विपुल ग्रंथ-निर्मिती करणे, आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी सोपे उपाय शोधणे इत्यादी व्यापक आध्यात्मिक कार्य करणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कुंडलीत १२ व्या (मोक्ष) स्थानात ‘बुध’, ‘शनि’ आणि ‘हर्षल’ यांची युती आहे, तसेच १२ व्या स्थानाच्या शेवटी ‘गुरु’ ग्रह स्थित आहे. हे योग साधनेची शिकवण, ग्रंथ-निर्मिती, आश्रमांची निर्मिती, आध्यात्मिक संशोधन, अध्यात्मप्रसार आदी परिणाम दर्शवतात. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून साधकांना प्रायोगिक स्तरावर साधनेची शिकवण दिली. ‘शिष्याची खरी आध्यात्मिक उन्नती ही गुरूंच्या कृपेने होत असते’, हा सिद्धांत मांडून गुरुकृपेचा लाभ सातत्याने होण्यासाठी त्यांनी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला. साधनेची प्रमुख तत्त्वे, साधनेत होणार्‍या मूलभूत चुका, साधनेचे प्रकार आणि साधनेतील टप्पे यांची त्यांनी सोप्या भाषेत शिकवण दिली.

त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून मार्च २०२५ पर्यंत सनातनचे १३२ साधक संत बनले आहेत. सनातनचे आतापर्यंत अध्यात्म, साधना, धार्मिक कृतींमागील शास्त्र, देवतांची उपासना, आपत्काळातील संजीवनी आदी विषयांवरील ३६६ ग्रंथ मार्च २०२५ पर्यंत प्रकाशित झाले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सूक्ष्म-जगतासंबंधी विपुल संशोधन आणि लेखन केले आहे. त्यांच्यातील संशोधकबुद्धीमुळे त्यांनी आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी नवीन आणि सोपे आध्यात्मिक उपाय शोधले आहेत. आज सनातनचे सहस्रो साधक समर्पित होऊन अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहेत.                                              (क्रमशः)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.४.२०२५)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/915976.html