राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य केलेले थोर संत आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडल्यांमध्ये आढळलेले समान ग्रहयोग आणि त्यांचे विश्लेषण !

गेल्या ४०० वर्षांचा विचार केल्यास १७ व्या शतकात समर्थ रामदासस्वामी, १९ व्या शतकात स्वामी विवेकानंद आणि २० व्या शतकात महर्षि अरविंद या संतांनी लोकांना साधना शिकवण्यासह राष्ट्र-धर्मरक्षणाचे मोठे कार्य केले. या संतांप्रमाणेच सध्याच्या २१ व्या शतकात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले राष्ट्र-धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. या ४ संतांच्या जन्मकुंडल्यांचा अभ्यास केल्यावर त्यांच्या जन्मकुंडल्यांतील अनेक ग्रहयोगांमध्ये साम्य असल्याचे आम्हाला आढळले. या ४ संतांच्या जन्मकुंडल्यांतील ग्रहयोगांचे विश्लेषण या लेखातून आपण पहात आहोत. १७ मे या दिवशीच्या लेखात आपण ‘समष्टी कार्य दर्शवणारे जन्मकुंडल्यांतील योग !’, या अंतर्गत या ४ संतांचे ‘आध्यात्मिक कार्य’ पाहिले. आजच्या शेवटच्या भागात त्यांचे ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य’ याविषयी माहिती दिली आहे.   (भाग ३)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/913657.html  

२ आ. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य

कुंडलीत रवि, मंगळ, गुरु आणि शनि यांचे एकमेकांशी महत्त्वाचे योग असणे, हे योग पूरक स्थाने आणि राशी यांमध्ये असणे इत्यादी योग व्यक्तीमध्ये समष्टी कार्य करण्याची क्षमता दर्शवतात. रवि, मंगळ आणि गुरु यांचे एकमेकांशी असलेले योग हे धैर्य, नेतृत्वगुण, कार्यक्षमता, बुद्धीमत्ता, तेज, सामर्थ्य इत्यादी प्रदान करतात. या गुणांमुळे व्यक्ती समाजाचे नेतृत्व करते आणि समाजाला दिशादर्शन करते. असे योग संतांच्या कुंडल्यांमध्ये असल्यास असे संत साधना शिकवण्यासह राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी समाजाचे नेतृत्व करतात. अशा संतांच्या माध्यमातून ईश्वरच कार्य करतो.

२ आ १. समर्थ रामदासस्वामी

समर्थ रामदासस्वामी

२ आ १ अ. लोकांमध्ये राष्ट्र-धर्मभावना जागृत करून त्यांना ‘हिंदवी स्वराज्या’च्या निर्माणकार्यात समर्पित होण्याची प्रेरणा देणे : समर्थ रामदासस्वामी यांच्या कुंडलीत ‘रवि’, ‘बुध’ आणि ‘गुरु’ यांची दशम (कर्म) स्थानात युती आहे, तसेच या ३ ग्रहांचा ‘मंगळ’ ग्रहाशी शुभयोग आहे. हे बलवान योग आहेत. हे योग क्षात्रतेज, सामर्थ्य, नेतृत्व, जनजागृती आदी परिणाम दर्शवतात. समर्थांच्या काळात दीर्घकालीन इस्लामी आक्रमणांमुळे जनता पिचून गेली होती. जनतेची प्रतिकारशक्ती लोप पावली होती. अशा कठीण प्रसंगी समर्थांनी त्यांच्या शिष्यांसह लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मनात राष्ट्र-धर्मभावना जागृत केली. समर्थांनी लोकांचे संघटन केले आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतलेल्या ‘हिंदवी स्वराज्या’च्या निर्माणकार्यात समर्पित होण्याची प्रेरणा दिली. श्री हनुमंताप्रमाणे शक्ती, भक्ती आणि बुद्धी प्राप्त होण्यासाठी समर्थांनी अनेक ठिकाणी हनुमंताची मंदिरे स्थापन केली आणि व्यायामशाळा उभारल्या. समर्थांचे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य अभूतपूर्व ठरले. त्यांच्या कार्यातून नंतरच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, राष्ट्रीय स्वयंस्वामी विवेकानंदसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार, इतिहासतज्ञ वि.का. राजवाडे आदी अनेक राष्ट्रभक्तांनी प्रेरणा घेतली.

२ आ २. स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद

२ आ २ अ. तरुणांना सशक्त बनून राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देणे, तसेच हिंदु धर्माला जागतिक स्तरावर नेणे : स्वामी विवेकानंद यांच्या कुंडलीत ‘रवि’, ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ यांचे एकमेकांशी योग आहेत. त्यांपैकी ‘रवि’ आणि ‘मंगळ’ हे अनुक्रमे ‘धनु’ आणि ‘मेष’ या अग्नितत्त्वाच्या राशींमध्ये आहेत. हा बलवान योग आहे. हा योग सामर्थ्य, तेज, बुद्धी, शक्ती आणि नेतृत्व दर्शवतो. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय समाजाला महान हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा दिली. त्यांनी तरुणांना शारीरिक आणि आत्मिक बळाने सशक्त होण्याचा मंत्र दिला. ‘उठा, जागृत व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका !’ या उद्घोषाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांनी भारतियांना कर्मयोगाची शिकवण देऊन राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.

स्वामी विवेकानंद यांनी ‘शिकागो’ (अमेरिका) येथील जागतिक धर्मपरिषदेला संबोधित करतांना हिंदु धर्माचा ‘सर्वसमावेशक, सहिष्णु आणि व्यापक’ दृष्टीकोन जगासमोर ठेवला. त्यामुळे सार्‍या जगाचे लक्ष भारताकडे आकर्षित झाले. स्वामीजींनी हिंदु धर्माला जागतिक स्तरावर स्थान दिले. स्वामीजींनी २ वर्षे ‘अमेरिका’ आणि ‘युरोप’ मध्ये प्रवास करून अध्यात्मावर शेकडो प्रवचने केली. त्यामुळे अनेक पाश्चात्य विद्वान, तत्त्वज्ञ, राजकारणी इत्यादी स्वामीजींच्या शिकवणीने प्रभावित झाले.

२ आ ३. महर्षि अरविंद

महर्षि अरविंद

२ आ ३ अ. मानवी चेतनेचा विकास साधण्यावर भर देणे आणि भारताला ‘विश्वाचा आध्यात्मिक गुरु’ होण्याचा मार्ग दाखवणे : महर्षि अरविंद यांच्या कुंडलीत गुरु ग्रहाची ‘रवि’, ‘मंगळ’ आणि ‘हर्षल’ या ग्रहांशी युती आहे. ही युती ‘कर्क’ या जलतत्त्वाच्या राशीत आहे. हा योग सूक्ष्म, संवेदनशील आणि भावात्मक पद्धतीने समष्टी कार्य करण्याची क्षमता दर्शवतो. महर्षि अरविंद यांचे राष्ट्रकार्य सूक्ष्म अन् दीर्घकालीन प्रभाव पाडणारे होते. त्यांनी राष्ट्रकार्याला आध्यात्मिक स्वरूप दिले. ‘भारताने राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासह आत्मिक स्वातंत्र्यही मिळवायला हवे. खरी क्रांती ही मानवी चेतनेमध्ये घडायला हवी. मनुष्याने दिव्यत्वाकडे प्रवास करायला हवा’, असे विचार त्यांनी मांडले. ‘मनुष्याच्या चेतनेचा स्तर खालावल्यामुळे तो वासनांना बळी पडून दुःखी आणि दुर्बल होतो; पण मनुष्याने साधनेद्वारे चेतनेचा विकास साधला, तर तो सशक्त, ज्ञानी, विवेकी, व्यापक आणि आनंदी बनेल. साधनेचे अंतिम ध्येय केवळ ‘मायेतून मुक्ती किंवा समाधी’ नसून ‘पृथ्वीवरील जीवनात दिव्यता आणणे’ हे आहे’, असा चेतनेच्या उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी मांडला. महर्षि अरविंद यांनी भारताला ‘विश्वाचा आध्यात्मिक गुरु’ होण्याचा मार्ग दाखवला. महर्षि अरविंद यांच्या विचारांमुळे अनेक क्रांतीकारक, नेते, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, कलाकार आदी प्रभावित झाले.

२ आ ४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२ आ ४ अ. देशविरोधी शक्तींकडून राष्ट्र-धर्मावर होणारे आघात जाणून त्यांच्या प्रतिकारासाठी भारतात ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेचा संकल्प करणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ‘मंगळ’ आणि अकराव्या (लाभ) स्थानात उच्च राशीतील ‘रवि’ आहे. त्यांच्या कुंडलीत ‘गुरु’ ग्रह पहिल्या स्थानाच्या आरंभी आहे. हे योग नेतृत्वगुण, धैर्य, कार्यतत्परता, संघटनकौशल्य, व्यापकता इत्यादी वैशिष्ट्ये दर्शवतात. भारतात काही दशकांपासून धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी, ख्रिस्ती मिशनरी, धर्मांध इस्लामी गट, तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी राष्ट्र-धर्मविरोधी शक्ती भारतातील हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करू पहात आहेत. ‘हिंदु धर्म हा भारताचा प्राण आहे. हिंदु धर्म नष्ट झाला, तर राष्ट्राचाही विनाश होईल’, हे जाणून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी भारतात ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेचा संकल्प केला. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रेरणेमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन केले जात आहे. हिंदु धर्मावरील विविध आघात, उदा. बलपूर्वक धर्मांतर, विविध प्रकारचे जिहाद, देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण, गोहत्या इत्यादी यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला जात आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या प्रेरणेमुळे भारतातील हिंदुत्वनिष्ठ एकत्र येऊन हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करत आहेत. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यास हिंदु धर्माच्या उच्चतम वैश्विक मूल्यांचे रक्षण होऊन समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष होईल आणि भारत हा ‘विश्वाचा आध्यात्मिक गुरु’ बनेल !

३. संतांच्या जन्मकुंडल्यांत आढळलेले समान ग्रहयोग

श्री. राज कर्वे

अ. वर उल्लेख केलेल्या ४ संतांच्या जन्मकुंडल्यांत धर्मस्थानांच्या (१, ५ आणि ९ या स्थानांच्या) स्वामींचा एकमेकांशी शुभयोग आहे. त्यामुळे बुद्धीमत्ता, भाग्य, पूर्वजन्मांची साधना, गुरुकृपा आदींचा लाभ होतो.

आ. या संतांच्या कुंडल्यांत मोक्षस्थानांच्या (४, ८ आणि १२ या स्थानांच्या) स्वामींचाही एकमेकांशी शुभयोग आहे. त्यामुळे त्याग, समर्पण, आध्यात्मिक उन्नती, आध्यात्मिक कार्य करणे आदी परिणाम होतात.

इ. या संतांच्या कुंडल्यांत अनेक ग्रहयोग समान आहेत. त्यामध्ये रवि-गुरु (ज्ञानशक्ती), बुध-शनि (तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक कार्य), शुक्र-शनि (मायेपासून अलिप्तता), गुरु-मंगळ (समष्टी कार्य करण्याची क्षमता) आणि चंद्र-नेपच्यून (सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता) या ग्रहयोगांचा समावेश आहे. बुध, शुक्र आणि शनि यांचे एकमेकांशी असलेले शुभयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक आहेत, तर रवि, मंगळ आणि गुरु यांचे एकमेकांशी असलेले शुभयोग राष्ट्र-धर्मरक्षणाच्या कार्यासाठी आवश्यक क्षमता दर्शवतात.

ई. या संतांच्या जन्मकुंडल्यांत ग्रहांचे प्रबळ अशुभयोग नाहीत. त्यामुळे व्यक्तीगत प्रारब्धामुळे जीवनात येणार्‍या अडचणी अल्प असतात.

३ अ. संतांच्या जन्मकुंडल्या व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याच्या दृष्टीने अनुकूल असणे : वरील विवेचनावरून लक्षात येते की, या संतांच्या जन्मकुंडल्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने उत्तम आहेत, तसेच त्या उच्च प्रतीच्या आणि असामान्य आहेत. या संतांच्या कुंडल्यांत ‘रवि’, ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ यांचे शुभयोग असल्याने त्यांचा दृष्टीकोन व्यापक असल्याचे दिसून येते, तसेच त्यांना राष्ट्र अन् धर्म यांची स्थिती सुधारण्याची तळमळ असल्याचेही दिसून येते. त्यांनी केवळ स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष दिले नाही, तर संपूर्ण समाजाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सबल बनवण्यासाठी प्रयत्न केले.

४. संतांच्या जन्मकुंडल्यांमध्ये चांगले योग असले, तरी त्यांनी केलेले प्रयत्न अधिक महत्त्वाचे

या संतांच्या जन्मकुंडल्यांमध्ये चांगले योग असले, तरी त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी चिकाटीने केलेले प्रयत्न, सर्वस्वाचा केलेला त्याग, राष्ट्रविरोधी शक्तींशी दिलेली झुंज, सातत्याने केलेला लोककल्याणाचा विचार आदी गोष्टी, म्हणजेच त्यांचे प्रयत्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या संतांनी त्यांच्या जीवनात आणि शिकवणीत प्रयत्नांनाच अधिक महत्त्व दिले आहे. जन्मकुंडलीतील ग्रहयोगांनुसार आपल्या जीवनात विशिष्ट परिस्थिती निर्माण होते. तिच्यावर आपले नियंत्रण नसते; परंतु त्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे, हे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. हे प्रयत्नच व्यक्तीला यश मिळवून देतात.

५. संतांच्या माध्यमातून ईश्वराने  धर्मसंस्थापनेचे कार्य करणे

भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतो, ‘जेव्हा अधर्म बळावतो, तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी मी स्वतः अवतार धारण करतो.’ मानवजातीचा आध्यात्मिक स्तर खालावला की, तो पुन्हा सुधारण्यासाठी ईश्वर विविध विभूतींच्या रूपात कार्य करतो. अलीकडच्या ४०० वर्षांचा विचार केल्यास समर्थ रामदासस्वामी, स्वामी विवेकानंद आणि महर्षि अरविंद यांच्या माध्यमातून ईश्वराने धर्मसंस्थापनेचे कार्य केले. आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या माध्यमातून ईश्वर हे कार्य करत आहे. या संतांमध्ये ईश्वराची उच्च स्तराची चेतना व्यक्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होणारे कार्य व्यक्तीगत मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे असलेल्या ‘विश्वमन’ आणि ‘विश्वबुद्धी’ यांच्या बळावर होते. त्यामुळे ते चिरकाल प्रभावी असते.

समाजाची तत्कालीन परिस्थिती आणि मानसिकता यांनुरूप अवतारी संतांची कार्य करण्याची पद्धत, त्यांची शिकवण, तत्त्वज्ञान, साधनामार्ग इत्यादींमध्ये विविधता आढळते; मात्र त्यांचे ध्येय एकच असते – ते म्हणजे मानवजातीला अज्ञान, संकुचितपणा आणि दुर्बलता यांतून बाहेर काढून ज्ञान, व्यापकता, सामर्थ्य आणि प्रेम यांचा मार्ग दाखवणे अन् मनुष्यात दडलेली ईश्वराची दिव्यता प्रकट करणे !’            (समाप्त)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.४.२०२५)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.