Khawaja Asif On Indian Drone : (म्हणे) ‘आमचे स्थान उघड होऊ नये; म्हणून भारताच्या ड्रोनला रोखले नाही !’

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे संसदेत हास्यास्पद विधान

ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – काल झालेले (८ मे या दिवशी) ड्रोन आक्रमण मुळात आमचे स्थान शोधण्यासाठी करण्यात आले होते. ही एक तांत्रिक गोष्ट आहे, जी मी अशा प्रकारे स्पष्ट करू शकत नाही. तथापि, आमचे स्थान उघड होऊ नये; म्हणून भारतीय ड्रोनला रोखण्यात आले नाही, असे हास्यास्पद विधान पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी ९ मे या दिवशी संसदेत केले. या वेळी त्यांनी ‘तुर्कीये, चीन आणि अझरबैजान पाकच्या बाजूने उघडपणे उभे आहेत’, अशी माहितीही दिली.

मदरशांतील मुले दुसरी संरक्षण फळी ! – ख्वाजा आसिफ

संपादकीय भूमिका

भारतातीलही मदरशांतून पाकच्या समर्थनार्थ कुणी लढण्यासाठी रस्त्यावर उतरले, तर आश्‍चर्य वाटू नये !

ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले की, मदरशांमध्ये शिकणारी मुले पाकिस्तानची दुसरी संरक्षण फळी आहेत. ते धर्माशी संबंधित आहेत आणि इतर आवश्यकतांसाठीही त्यांचा वापर केला जाऊ शकतो. (दुसरी फळी म्हणजे जिहादी आतंकवादी होण्यासाठी सिद्ध असलेली फळी ! आसिफ असे थेट म्हणत नसले, तरी तेच आतापर्यंत होत आलेले आहे. – संपादक) आमचे सैन्य सीमेवर पूर्ण शक्तीनिशी लढत आहे. प्रत्येक गोष्टीत भारताची शक्ती आणि सैन्य आपल्यापेक्षा मोठे आहे, तरीही आपण त्यांच्याशी लढत आहोत. (‘लढत आहोत’ऐवजी ‘मार खात आहोत’, असे आसिफ यांनी सांगायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • असे संरक्षणमंत्री असणारा देश कधीतरी भारताशी युद्ध करून त्यात तग धरू शकतो का ?
  • पाकिस्तानचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी केलेले हे लज्जास्पद विधान आहे, हे पाकचे एखादे शेंबडे पोरही सांगेल !