‘२८.१.२०२५ या दिवशी पुणे येथील श्रीमती चन्नबसव्वा श्रीशैल परचंडे (वय ७२ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्रीमती अलका व्हनमारे (कै. (श्रीमती) चन्नबसव्वा यांची मोठी मुलगी), सोलापूर
१ अ. कष्टमय जीवन : ‘माझी आई कै. (श्रीमती) चन्नबसव्वा श्रीशैल परचंडे (वय ७२ वर्षे) हिचे वैवाहिक जीवन कष्टमय होते. माझे वडील (श्रीशैल बसप्पा परचंडे) फार कडक स्वभावाचे होते. आईला घरी आरंभापासूनच त्रास झाला. माझ्या वडिलांना ३ वेळा हृदयविकाराचा झटका आला. आईने त्यांची मनापासून सेवा केली. वर्ष २००१ मध्ये वडिलांचे वय ५६ वर्षे असतांना त्यांचे निधन झाले. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने मी, माझा भाऊ श्री. अशोक आणि माझी बहीण(आताच्या सौ. रेखा जवळे) यांचा सांभाळ केला.
१ आ. गंभीर आजारात प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा : वर्ष २००७ मध्ये आईला सर्दी झाली. तिची सर्दी डोक्यापर्यंत पोचली आणि ती बेशुद्ध झाली. तेव्हा तिला प्रचंड त्रास झाला. आई शुद्धीवर आल्यावर तिने सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज माझ्या शेजारी बसले होते. त्यांनी मला वाचवले.’’
१ इ. नामजप करणे : आई घराजवळच्या एका दत्त मंदिरात जात असे. ती मंदिरात बसून कुलदेवी आणि दत्तगुरु यांचा नामजप करत असे.

१ ई. ‘मुलीची साधना व्हावी’, यासाठी नातवाला संभाळणे : आईने आमच्यावर चांगले संस्कार केले. तिने आमच्या मुलांचाही चांगल्या प्रकारे सांभाळ केला. ‘मला साधना करायला वेळ मिळावा’, यासाठी मी माझ्या मुलाला (देवदत्तला) आईकडे ठेवले होते. माझ्या आईने देवदत्तला ७ वर्षे सांभाळले.
१ उ. गंभीर आजार होऊन आईचे निधन होणे : जानेवारी २०२३ मध्ये आईच्या डोक्यात पाणी झाले. तेव्हा तिचे शस्त्रकर्म झाले. तेव्हापासून तिची प्रकृती खालावली आणि वर्ष २०२५ मध्ये शेवटी तिने अन्न घेणे बंद केले. आम्ही तिला ‘गुरुदेवांचे तीर्थ’ या भावाने गंगाजल पाजले. आईच्या अंत्यसमयी मी तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवले.
२. सौ. रेखा जवळी (कै. (श्रीमती) चन्नबसव्वा यांची धाकटी मुलगी), भोसरी, पुणे
२ अ. साधी रहाणी : ‘आईचे राहणीमान साधे आणि नियोजनबद्ध होते. ती नेहमी डोक्यावर पदर घेत असे. तिने ‘एखादी आवडीची वस्तू हवी आहे’, असे कधीच सांगितले नाही.
२ आ. स्वीकारण्याची वृत्ती : आईला पुष्कळ कष्टमय जीवन जगावे लागले. नातेवाइकांनी तिला कठीण परिस्थितीत साहाय्य केले नाही. तिने कुणाविषयी काहीही गार्हाणे केले नाही. तिने सर्व परिस्थिती स्वीकारली.
२ इ. सकारात्मक विचारसरणी : आईला नातेवाईक आणि समाजातील व्यक्ती यांच्याकडून पुष्कळ त्रास झाला. तिला पुष्कळ शारीरिक त्रास होता. मला त्याविषयी वाईट वाटत असे. मी आईला ‘‘तू देवाकडे काही का मागत नाहीस ?’’, असे विचारल्यावर ती मला म्हणायची, ‘‘हेही दिवस जातील.’’
३. सौ. शोभा परचंडे (कै. (श्रीमती) चन्नबसव्वा यांची सून), चिखली, पुणे.
३ अ. त्यागी वृत्ती : ‘माझ्या सासूबाई (आई) एकदा रुग्णाईत होत्या. तेव्हा सोलापूर येथील माझ्या नणंद श्रीमती अलका व्हनमारे यांच्या समवेत एक साधक घरी आले होते. त्या वेळी घरात एक वर्षाचे धान्य भरून ठेवले होते. ते पाहून ते साधक आईंना म्हणाले, ‘‘यातील १ पोते धान्य आश्रमाला अर्पण द्या.’’ तेव्हा आईंनी कसलाही विचार न करता एक पोते अर्पण करण्याची सिद्धता दाखवली.
३ आ. इतरांचा विचार करणे : आरंभी आमच्यात सासू-सुनेचे नाते होते; मात्र आमची साधना वाढू लागल्यावर आमच्या नात्यातील गोडी वाढली.
१. जानेवारी २०२३ मध्ये आईंच्या डोक्याचे मोठे शस्त्रकर्म झाले. त्यानंतर त्या झोपूनच होत्या. तेव्हा त्या मला म्हणायच्या, ‘‘तुला माझे किती करावे लागते, माझ्यामुळे तुला किती त्रास होतो !’’
२. एकदा मी त्यांना रुग्णालयात भेटायला गेले होते. तेव्हा त्यांना त्रास होत होता. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘‘तू जेवण करून आलीस ना.’’
३ इ. घरी चैतन्य जाणवणे : आमच्या घरी आईंना भेटायला अनेक जण येत असत. तेव्हा त्यांना ‘घरी एखादी रुग्णाईत व्यक्ती आहे’, असे वाटत नव्हते. आमच्या घरी चैतन्य जाणवत होते.
३ ई. आईंची सेवा करतांना व्यष्टी साधनाही होणे : गुरुदेवांच्या कृपेने माझे नामजपादी उपाय होत होते. आईंची सेवा करतांना मला अनेक वेळा पुष्कळ दमल्यासारखे होत असे. माझी साधना वाढल्यावर माझा त्रास न्यून झाला. आईची सेवा करतांना गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून व्यष्टी साधनेचेही प्रयत्न झाले.
३ उ. नातवांची क्षमा मागणे : माझा मुलगा श्री. आशुतोष (वय १८ वर्षे) आणि भाचा श्री. देवदत्त व्हनमारे (वय २० वर्षे) प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सेवेनिमित्त जाणार होते. तेव्हा ते आईंना भेटले. तेव्हा आई त्यांना म्हणाल्या, ‘‘मुलांनो नीट जा. नीट रहा. मी तुमच्यासाठी एक अडथळा बनले आहे. त्यासाठी मला क्षमा करा.’’ त्यांनी हात जोडून मुलांची क्षमा मागितली.
३ ऊ. निधनाच्या वेळी नामजपादी उपाय करणे : आईंच्या अंत्यसमयी आम्ही मोठ्याने ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ४ वेळा आणि ‘श्री विष्णवे नम: ।’ एक वेळा, असा नामजप करत होतो. तेव्हा माझ्याकडून आईंच्या मस्तकावर एक हात आणि दुसरा हात छातीवर ठेवला गेला.’
४. सौ. वंदना संकपाळ (साधिका), चिंचवड, पुणे.
४ अ. मुलांवर चांगले संस्कार करणे : ‘श्रीमती परचंडेआजी आजारी असतांना त्यांच्या दोन्ही मुली, मुलगा आणि सून यांनी आजींची सेवा कुटुंबभावाने आणि प्रेमाने केली. ‘परचंडेआजींनी मुलांवर चांगले संस्कार केले’, असे मला वाटते.’
(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : (६.२.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |