साहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती लवकरच ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

चंद्रकांत पाटील

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापकांची ४ सहस्र ४३५ रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून लवकरच भरतीला गती देण्यात येईल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीत सदस्य सत्यजित तांबे, विक्रम काळे, अभिजित वंजारी या सदस्यांनी सहभाग घेतला.