कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेला ७५ वर्षे झाल्याचा शासन-प्रशासकीय पातळीवर विसर हे दुर्दैवी ! – उमाकांत राणिंगा

‘भारतीय इतिहास संकलन समिती’चे एकदिवसीय ‘राष्ट्रीय चर्चासत्र !’

‘भारतीय इतिहास संकलन समिती’च्या चर्चासत्रात सहभागी विविध मान्यवर आणि  १. श्री. उमाकांत राणिंगा

कोल्हापूर, ८ मार्च (वार्ता.) – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मार्च १९४९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची स्थापना झाली. या घटनेला मार्च २०२५ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली. ही कोल्हापूरच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना असल्याने आम्ही या संदर्भात एक चर्चासत्र आयोजित केले आहे. या निमित्ताने आम्ही अनेक लेखकांचे शोधनिबंध मागवले आणि त्यांचे एक पुस्तक सिद्ध करून प्रकाशन करण्याचे नियोजन केले. कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेला ७५ वर्षे झाल्याच्या गोष्टीचा शासन-प्रशासकीय पातळीवर विसर पडावा, हे दुदैव आहे; मात्र इतिहास संकलन समितीच्या वतीने आम्ही तो साजरा करत आहोत, असे मत ‘भारतीय इतिहास संकलन समिती’चे उपाध्यक्ष श्री. उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केले. ते ‘भारतीय इतिहास संकलन समिती’च्या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते.

या प्रसंगी अध्यक्ष डॉ.बी.डी. खणे, सचिव डॉ. आरेन हर्डीकर, सचिव श्री. किशोर दीक्षित, विधी सल्लागार अधिवक्ता प्रसन्ना मालेकर, महिला प्रतिनिधी डॉ. नीला जोशी यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

श्री. उमाकांत राणिंगा म्हणाले, ‘‘या परिषदेच्या माध्यमातून आपण कोल्हापूरची अमृत महोत्सवी वाटचाल, कोल्हापूरची पंचगंगा नदी, कोल्हापूरचे श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, पर्यटन, विविध संशोधन, पुरावे नागरिकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहोत.’’

जयंती ‘नाला’ नसून ती ‘नदी’च आहे ! – डॉ. वंदना पुळगावकर

या प्रसंगी डॉ. वंदना पुळगावकर म्हणाल्या, ‘‘सध्या कोल्हापूर येथे ‘जयंती नाला’ असा उल्लेख केला जातो; मात्र तो नाला नसून ती ‘नदी’ आहे. याला ‘नदी’ म्हणून घोषित होण्यासाठी शासन पातळीवर, सामाजिक पातळीवर काय काम करावे लागेल ? या संदर्भात मी संशोधन केले आहे. या नदीचे पूर्वीचे नाव ‘जिवंती’ होते. याचा उल्लेख पूर्वीच्या ‘करवीर महात्म्य’ या ग्रंथात आहे. मध्ययुगीन काळात काही कागदपत्रांवर याचा उल्लेख ‘ओढा’ असा आला. त्यामुळे नंतरच्या काळात त्याचा ओढा आणि आता ‘नाला’ असा उल्लेख केला जातो. भौगोलिकदृष्ट्या एखाद्या ओढ्याची लांबी ही १५ किलोमीटरपेक्षा अधिक असल्यास तिला ‘नदी’ म्हणतात. जयंती ओढ्याची लांबी १५ किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने ती नदीच आहे.’’