‘काही वर्षांपूर्वी मी हिंदु जनजागृती समितीशी संबंधित सेवा करत असतांना माझा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी काही वेळा संपर्क होत असे. २०.११.२०२४ या दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसाद ग्रहण करत असतांना १ घंटा मला त्यांचा सत्संग लाभला. त्या वेळी गुरुकृपेने सद्गुरु पिंगळेकाकांकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. प्रांजळपणा
सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांच्या समवेत रात्री देवद आश्रमातील संत महाप्रसाद ग्रहण करत होते. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितले, ‘‘मी उत्तर भारतात एकटाच असतो. मला येथे आल्यावर ‘मी गोकुळात आलो आहे’, असे वाटले. मी साधक किंवा संत यांच्याशी बोलतो. तेव्हा मला त्यांच्याकडून शिकता येते.’’ त्यांनी आम्हाला त्यांच्या मनात येणारे, म्हणजे गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) त्यांना सुचवलेले सर्व विचार प्रांजळपणे सांगितले. तेव्हा मला ‘मनमोकळेपणाने बोलणे आणि शिकण्याच्या स्थितीत रहाणे’ या गुणांचे महत्त्व समजले.
२. आध्यात्मिक स्तरावर कार्य करत असणे आणि त्यांच्या सत्संगात प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळत असणे

सद्गुरु काका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत, तसेच त्यांच्याकडे धर्मप्रचाराचे मोठे दायित्व आहे. ते अध्यात्म, साधना आणि गुरुदेव यांच्याविषयी बोलले. ‘त्यांचे कार्य आध्यात्मिक आणि सूक्ष्म या स्तरांवर होते. ते ‘प्रत्येक प्रसंगात समोरच्या व्यक्तीमध्ये गुरुरूप आहे’, असे समजून कार्य करतात’, असे मला वाटते. ते कठीण प्रसंग हाताळतांनाही अत्यंत स्थिर आणि सकारात्मक असतात. त्यामुळे वातावरणातील स्पंदने पालटतात आणि संबंधित साधक अन् व्यक्ती यांमध्येही सकारात्मकता येते. त्यांचे बोलणे ऐकणारी व्यक्ती सहजतेने सर्वकाही स्वीकारण्याच्या आणि शिकण्याच्या स्थितीत येते. ते साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कार्य आध्यात्मिक स्तरावर होत असल्याने त्यांच्या सत्संगात प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळतो.
३. गुरुंप्रती भाव
सद्गुरु काकांनी सांगितले, ‘‘आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ओळखू शकत नाही. ‘त्यांना जाणणे’, ही आपली साधना आहे. ‘ते अवतार आहेत’, हेही आपण ओळखू शकत नाही. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही अवतार आहेत’, हे आपण ओळखू शकलो नाही.’’
४. कृतज्ञता
मला लाभलेल्या सद्गुरु पिंगळेकाकांच्या केवळ एका घंट्याच्या सत्संगात मला सद्गुरु पिंगळेकाकांमधील ‘तत्परता, उत्तम निरीक्षणक्षमता, नेतृत्वगुण, तत्त्वनिष्ठता, प्रगल्भता, विनम्रता आणि प्रीती’ आदी दैवी गुणांचे दर्शन झाले. ‘त्यांनी मला एक प्रकारे साधनेची दिशा दिली’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या प्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
धन्य ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! आणि धन्य ते त्यांनी घडवलेले सद्गुरुरत्न डॉ. चारुदत्त पिंगळे !’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.११.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |