मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा संगम ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देहलीत ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देहली – मराठीत शूर, वीर, सौंदर्य, संवेदना, समानता, समरसता, अध्यात्म आणि आधुनिक असे अनेक रस आहेत. यांसह मराठी भाषा ही भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा संगम आहे. जेव्हा भारताला ऊर्जेची आवश्यकता होती, तेव्हा मराठी भाषिक संतांनी प्राचीन ऋषींचे ज्ञान सोप्या भाषेत लोकांना सांगितले. यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज यांसह अनेकांचा समावेश होता. संत रामदासस्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा । आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळावावे, महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे-तिकडे’, असे सांगितले असून मराठी एक संपूर्ण भाषा आहे, असे गौरवोद्गार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी काढले. देहलीत ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

या प्रसंगी संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष शरद पवार यांसह विविध मान्यवर, साहित्यिक उपस्थित होते.

भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून भाषा ही संस्कृतीची संवाहक !

पंतप्रधान म्हणाले, ‘‘मी जेव्हा मराठीविषयी विचार करतो, तेव्हा मला नेहमी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची आठवण येते. त्यांनी ‘माझ्या मराठीची बोल कौतुके ! परी अमृताते ही पैजा जिंके । ऐकी अक्षरे रसिके मेळवीन ।’, असे सांगितले आहे. याच महाराष्ट्राच्या भूमीत १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली असून ते संघाचे शताब्दी वर्ष आहे. संघाने युवकांना देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली. संघामुळे मला मराठी भाषा आणि परंपरा यांना जोडण्याची संधी मिळाली ! भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून भाषा ही संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजात जन्म घेतात; मात्र भाषा समाजाच्या निर्माणकार्यात महत्त्वाची भूमिका बजावते.’’

पंतप्रधानांकडून ‘छावा’ चित्रपटाचे कौतुक !

पंतप्रधान म्हणाले, ‘‘गेले काही दिवस ‘छावा’ चित्रपट गाजत असून छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदीप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोचत आहे.’’ हे वाक्य पंतप्रधानांनी सांगितल्यावर सभागृहात ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या.

संमेलनावर जाणीवपूर्वक इस्लामची छाप दाखवण्याचा प्रयत्न !

या संमेलनात ‘सरहद’ संस्थेचे लोक वारंवार मराठीत मुसलमानांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे उल्लेख करत होते. ‘काश्मीर येथे मुसलमान युवकांनी बंदुका सोडून लेखण्या हाती घेतल्या’, असे सांगितले. समारोपप्रसंगी ‘शमीमा अख्तर’ हिने मफलर गुंडाळून नमाज पढतांना हात वर करतात, तसे हात वर करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ‘पसायदान’ म्हटले. तिने उच्चारलेले अनेक शब्द अत्यंत अयोग्य होते. मुसलमान महिलेने पसायदान म्हटलेले पुरेसे नसल्याने रुकय्या मकबूर या मुसलमान महिलेने ‘नमोकार’ मंत्र म्हटला. शमीमा हिने महाराष्ट्राचे राज्यगीत म्हटले. या सर्व महिलांनी ‘त्या इस्लामी आहेत’, हे जाणीवपूर्वक दर्शवणारे पोषाख घातले होते.