Mahakumbh 2025 : प्रयागराज येथील भूमी वक्फ बोर्डाची असल्याची म्हणणार्‍यांना देशाबाहेर हाकलावे ! – श्री पंच निर्वाणी अनि आखाडा

मार्गदर्शन करतांना श्रीमहंत डॉ. महेश दास

प्रयागराज (उत्तरप्रदेश), ९ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रयागराज येथील भूमी ही भारद्वाज ऋषींची भूमी आहे. साक्षात् गंगामाता येथे वहाते. या भूमीत महाकुंभ होत असतांना ‘ही भूमी वक्फ बोर्डाची आहे’, असे म्हणणार्‍यांना खरेतर या देशाबाहेर हाकलून लावायला हवे. महाकुंभात सहभागी होणारे सर्वच भाविक अशांना कधीच क्षमा करणार नाहीत. अशी वक्तव्ये करणार्‍यांवर कठोर कारवाई करून वक्फ बोर्ड रहित केला पाहिजे’, अशी रोखठोक भूमिका श्री पंच निर्वाणी अनि आखाड्याचे व्यवस्थापक श्रीमहंत डॉ. महेश दास यांनी मांडली.

श्रीमहंत डॉ. महेश दास (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांची भेट घेतली.

महामंडलेश्‍वर संपूर्णानंद महाराज (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

पंजाबचे श्री शंभु अग्नि आखाड्याचे सचिव महामंडलेश्‍वर संपूर्णानंद महाराज आणि श्री पंचायती निर्मल आखाड्याचे पीठाधीश्‍वर पू. ज्ञानदेव सिंह महाराज यांची भेट घेऊन त्यांचाही सन्मान केला.

श्री पंचायती निर्मल आखाड्याचे पीठाधीश्‍वर पू. ज्ञानदेव सिंह महाराज (डावीकडे) यांचा सन्मान करून भेटवस्तू देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

श्रीमहंत डॉ. महेश दास पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्रासाठी सर्वच आखाडे कृतीशील आहेत. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे. सनातन धर्मासाठी ही मागणी करणे आवश्यक आहे. आज मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. मशिदी आणि चर्च यांचे सरकारीकरण का केले गेले नाही ? सरकारला आमची मागणी आहे की, मंदिरे त्यांचे व्यवस्थापक आणि विश्‍वस्त यांच्याकडे सोपवा. यात कुणाचा हस्तक्षेप झाल्यास याविषयी आम्ही निश्‍चित संघर्ष करू !