|

माणगांव, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदूंच्या मंदिरांवर मोगलांच्या काळापासून आक्रमणे चालू आहेत. मंदिरांमुळे हा देश सशक्त बनणार आहे, हे ओळखून इस्लामी आक्रमकांनी प्रथम मंदिरांना लक्ष्य करून ती उद्ध्वस्त केली; मात्र आता केंद्रात आणि राज्यात प्रखर हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे. मी कडवट हिंदुत्वनिष्ठ पालकमंत्री आहे. त्यामुळे हिंदूंनी न घाबरता कार्य केले पाहिजे. हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असे संघटन निर्माण करू. यापुढे हिंदु राष्ट्राचा प्रवास मंदिरे सुरक्षित ठेवील, असे परखड उद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी येथील मंदिर परिषदेत काढले.

हिंदु जनजागृती समिती, श्री दत्त मंदिर न्यास, माणगांव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ फेब्रुवारी या दिवशी माणगांव येथील श्री दत्त मंदिराच्या सभागृहात ‘द्वितीय सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर मंदिर-न्यास अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला पालकमंत्री श्री. राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या अधिवेशनाचे उद्घाटन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, श्री दत्तमंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. सुभाष भिसे, सचिव श्री. दीपक साधले, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट आणि मंदिर महासंघाचे श्री. अनुप जयस्वाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या परिषदेला ६०० हून अधिक विश्वस्तांची उपस्थिती लाभली. या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच ‘श्री दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारा’चे अध्यक्ष डॉ. वि.म. काळे यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
🛕 @NiteshNRane Guardian Minister, Sindhudurg District vows to protect Hindu temples!
“We’ll build an organization so strong that no one dares to harm our temples”.
Over 600 temple trustees unite in Mangaon, Sindhudurg, Maharashtra to take proactive steps against temple… pic.twitter.com/vA5SPFrrlb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 8, 2025
अधिवेशनाच्या प्रारंभी श्री. सुशांत भागवत यांनी शंखनाद केला, तर श्री. जयवंत म्हैसकर आणि श्री. प्रसाद साधले यांनी वेदमंत्रपठण केले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी या मंदिर अधिवेशनाच्या निमित्ताने पाठवलेल्या संदेशाचे श्री. भरत राऊळ यांनी वाचन केले. या वेळी मंत्री श्री. नीतेश राणे यांचा, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. रणजीत देसाई, तसेच माणगांवच्या सरपंच सौ. मनीषा भोसले यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील यांनी केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘वैयक्तिक जीवनासमवेत सामाजिक जीवनात मंदिरांना विशेष महत्त्व आहे. धर्माशी निगडित असलेल्या या मंदिरांसाठी मंदिर अधिवेशन होणे, ही गोष्ट हिंदु समाजासाठी गौरवास्पद आहे.’’
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –
|
या वेळी मंदिर महासंघाच्या वतीने पालकमंत्री श्री. राणे यांना काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ‘या मागण्यांच्या संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन राणे यांनी मंदिर महासंघाला दिले.
मंदिरांमधील वाद मिटवण्यासाठी होणार प्रयत्न !
‘सिंधुदुर्गातील काही मंदिरांमध्ये मानपानावरून वाद चालू असल्याने मंदिरे बंद आहेत. येत्या २ मासांत मंदिर महासंघाच्या पुढाकारातून असे वाद मिटवून मंदिर चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आपल्यापैकी यासाठी कोण पुढाकार घेणार आहे ?’, असे श्री. सुनील घनवट यांनी विचारले. त्यावर काही विश्वस्तांनी हात वर करून आपण वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा प्रतिसाद दिला.
मंदिरेही उपासनेची केंद्रे बनली पाहिजेत ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले की, भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मंदिर संस्कृतीवर घाला घालणार्या ज्या काही विकृती आहेत, त्यांचे समूळ उच्चाटन करणे आणि मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे यांसाठी कृतीशील होणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. आज हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे मुली लव्ह जिहादमध्ये फसत आहेत. हिंदूंचे धर्मांतरण होत आहे. मंदिरातून लहानांसाठी बालसंस्कारवर्ग, किशोरांसाठी सुसंस्कारवर्ग, युवकांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि मोठ्यांसाठी सत्संग चालू करणे आवश्यक आहे. मंदिरेही उपासनेची केंद्रे बनली पाहिजेत.

देवस्थानांच्या भूमी देवस्थानांनाच मिळाव्यात, यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
‘सेक्युलर’ म्हणवणारी सरकारे मंदिरांना कोणताही निधी देत नाहीत, धर्माच्या संदर्भात कोणतेही साहाय्य किंवा कार्य करत नाहीत, तर मग त्यांना मंदिरे चालवण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होतो ? ‘सेक्युलर’ राजकारणी कोणतीही मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत. मग हिंदु मंदिरांच्या संदर्भातच हा दुजाभाव का ? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थानांच्या भूमी काही जणांच्या माध्यमातून बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे प्रशासन आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्ष घालून देवस्थानांच्या जागा देवस्थानांनाच मिळाव्यात, यासाठी ठोस भूमिका घ्यावी. प्रत्येक मंदिराच्या समस्या भिन्न असून त्या समस्यांवर उपाय शोधणे आवश्यक आहे आणि ते आपल्याला मंदिर महासंघाच्या माध्यमातून साध्य करायचे आहे. हिंदूंचे सर्वाधिक एकत्रीकरण मंदिरांमध्ये होते. त्यामुळे मंदिरांच्या विश्वस्तांचे संघटन हे हिंदूसंघटनाच्या दृष्टीनेही पुष्कळ महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने विश्वस्तांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
माणगांव येथील सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर-न्यास अधिवेशनात संत आणि मान्यवर यांनी व्यक्त केलेले विचार आणि अन्य सूत्रे
मंदिर संस्कृती धर्माचा अविभाज्य आहे ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

मंदिरांनी भारतीय संस्कृती आणि इतिहास टिकवून ठेवला आहे. मंदिर संस्कृती धर्माचा अविभाज्य भाग आहे. ही मंदिरे टिकवणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. आपण मंदिर परिषदेच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. जन्महिंदूंना कर्महिंदू बनवणे, हे मंदिरांतून साध्य होईल. मंदिरांना पूर्वीच्या काळातील राजांनी पूर्ण साहाय्य केले. आता मंदिरे लुटली जात आहेत. हे थांबवायचे असेल, तर मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंना संघटित व्हावे लागेल. त्यासाठी मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे झाली पाहिजेत. ही मंदिर संस्कृती टिकवून ठेवणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. मंदिरातील पुजार्यावर भक्तांची श्रद्धा असते. मंदिरातील पुजारी धर्मशिक्षित झाला, तर तो भक्तांना योग्य मार्गदर्शन करील आणि त्याचा भक्तांना लाभ होईल. मंदिर महासंघाच्या वतीने काही मंदिरांतून धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. त्यानंतर अनेक मंदिरांतून धर्मशिक्षणवर्ग चालू झाले.
देवस्थानांची भूमी हडप करण्याच्या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी सक्षम कायदा करणे आवश्यक ! – अनुप जयस्वाल, महाराष्ट्र मंदिर महासंघ

महाराष्ट्रात अनेक देवस्थानांमध्ये विश्वस्त मंडळ अस्तिवात नाही. देवस्थाने नोंदणीकृत नसल्यामुळे, तसेच देवस्थानांतील विश्वस्त मंडळात वाद असल्याने भूमी हडपणारे हे महसूल विभागातील भ्रष्ट अधिकार्यांशी संगनमत करून भूमी महसूल अधिनियम अन् कुळ कायद्यातील तरतुदी यांचा भंग करून देवस्थानांच्या भूमी हडप करतात. याला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात सक्षम कायदा असणे आवश्यक आहे. हा कायदा करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंदिर महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलेले आहे. हा कायदा करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. देवस्थानाची भूमी देवस्थानाच्या कह्यात ठेवण्याकरता मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांची कर्तव्ये पूर्ण दायित्वाने पार पाडली पाहिजेत. स्थानिक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील देवस्थानांशी संबंधित दस्तऐवजांच्या प्रती विश्वस्त मंडळांकडे असणे आवश्यक आहे.
मंदिरे भक्तांचे रक्षण करणारी संरक्षण केंद्रे आहेत ! – अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे

भाविक जर मंदिरांशी जोडले गेले, तर ‘मंदिर संरक्षण दल’ सिद्ध होऊ शकते, ज्यामध्ये प्रत्येक भाविकाला भगवंताच्या त्या सैन्याचा एक सैनिक म्हणून सेवा करता येईल. मंदिराशी अधिकाधिक भक्तांना जोडण्यासाठी ‘सामूहिक आरती’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. सामूहिक आरतीमुळे प्रत्येक हिंदूला नित्यनेमाने मंदिरात जाण्याची सवय लागते आणि यातून मोठे संघटन उभे राहील. आपली हिंदु मंदिरे केवळ शांती आणि मनस्वास्थ्य देणारी केंद्रे नाहीत, तर भक्तांचे रक्षण करणारी संरक्षण केंद्रे आहेत.

परिषदेला उपस्थित हिंदूंचे मनोगत
१. प्रवीण गवस, उगाडे – शिर्डी येथील मंदिर परिषदेसाठी गेलो होतो. तेथे प्रेरणा मिळून आमच्या उगाडे गावातील श्री देवी सातेरी मंदिर आणि रवळनाथ मंदिर येथे सामूहिक आरती, बालसंस्कार वर्ग अन् धर्मशिक्षणवर्ग चालू केले आहेत. आम्हाला सनातन संस्थेमुळे धर्मशास्त्र समजले.
२. श्री विष्णु गवस, वाफोली – या परिषदेमुळे आमच्या ज्ञानात भर पडली. अनेक शंकांचे निरसन झाले. मंदिरांच्या संदर्भातील समस्यांवरील उपाय म्हणजे आम्हा हिंदूंना एकत्र येऊन कार्य करावे लागेल. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आपल्याला साहाय्य करत आहे. त्याचा लाभ घेऊया. तालुक्यात मंदिर परिषद घेऊन हा विषय गावातील प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि बंद पडलेली मंदिरे चालू करूया.
३. बाळा दळवी, उपवडे – मंदिर परिषदेच्या आयोजनाच्या बैठकीतून प्रेरणा मिळाली आणि अनेकांना संघटित करून येथे आणू शकलो. आमच्या गावाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करू. आजच्या मंदिर परिषदेत मांडलेले विषय गावबैठकीत घेण्यात येतील.
परिषदेतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. मंदिर परिषदेमध्ये स्थानिक स्तरावर कृतीची सूत्रे ठरवण्यात आली. त्यामध्ये तालुकास्तरीय अधिवेशन घेणे, २ महिन्यांतून एकदा बैठक घेणे, मंदिरांमध्ये आरती चालू करण्याचे ठरवण्यात आले.
२. महाराष्ट्र मंदिर महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा गाभा समिती निवडण्यात आली. यामध्ये विष्णु महादेव गवस (वाफोली), सुनील दत्ताराम परब (कुणकेरी), नंददीपक भगवान गावडे (हेदुळ), प्रकाश काशीनाथ गवस (झोळंबे), यशवंत परब (कसाल), दीपक साधले (माणगांव) आणि शिवराम देसाई (डेगवे) यांचा समावेश आहे.
३. मंत्री नितेश राणे यांना मंदिर महासंघाच्या वतीने श्री. सुनील घनवट यांनी ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ (भूमी अतिक्रमण विरोधी कायदा) कार्यवाहीत यावा यासाठी, मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजराजेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी निधी वाढवून मिळावा या ३ सूत्रांविषयी निवेदने दिली.
मंदिर परिषदेतील क्षणचित्रे
१. अदांजे १५०० जणांनी परिषद ऑनलाईन पाहिली.
२. गटचर्चेत मंदिर विश्वस्तांचा उत्स्फूर्त सहभाग होता
३. सनातच्या ग्रंथांचे प्रदर्शन मंदिराच्या आवारात लावण्यात आलेले होते. या ग्रंथप्रदर्शनाला परिषदेसाठी आलेल्या विश्वस्तांच्या व्यतिरिक्त मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांनीही लाभ घेतला.
४. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे असलेली देवालये मुक्त करण्याच्या आंदोलनाला सर्व विश्वस्तांनी होकार दर्शवला.
५. चर्चासत्रात मंदिरांसंदर्भात कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्यासंदर्भात मंदिर विश्वस्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
६. ‘मंदिर सरकारीकरण नको. ते थांबले पाहिजे’, अशी भावना काही विश्वस्तांनी व्यक्त केली.
धर्मप्रेमी श्री. कुशवा यांचे अनुभवकथन
धर्मप्रेमी श्री. कुशवा यांनी माडखोल, तालुका सावंतवाडी येथील जत्रेत अहिंदूंना मंदिर विश्वस्तांच्या साहाय्याने दुकाने लावण्यापासून रोखले आणि त्यांना तेथून हाकलून लावले, याविषयीचा अनुभव कथन केला. ‘हिंदूंच्या जत्रेत धर्मांधांचे काय काम आहे ?’, असा प्रश्न विचारून त्यांनी ११ धर्मांधांना त्यांचा गाशा गुंडाळायला लावला.