दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गोमांस विक्री करणार्‍या धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !; ‘कामाची संधी’ विज्ञापन देऊन फसवणूक…

गोमांस विक्री करणार्‍या धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

जळगाव – शिरसोली प्र.न. गावातील अशोकनगर भागातील फुकटपुरा परिसरात पत्र्याच्‍या शेडमध्‍ये गोमांसाची विक्री करणारे शेख युनूस, निहाल शेख आणि शेख कलीम यांना ग्रामस्‍थांनी रंगेहात पकडून एम्.आय.डी.सी. पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. या तिघांवर प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्‍या विविध कलमानुसार गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून पुढील अन्‍वेषण समाधान टहाकळे करत आहेत.

संपादकीय भूमिका : राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना होणार्‍या गोहत्‍या रोखण्‍यासाठी कायद्याचे भय निर्माण होईल, अशी कारवाई आवश्‍यक !


‘कामाची संधी’ विज्ञापन देऊन फसवणूक

मुंबई – सायबर चोरट्यांनी ‘घरातून कामाची संधी’ असे आमीष दाखवून तरुणाची २४ लाख ४५ सहस्र रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी अधिकोषाच्‍या खात्‍यात पैसे भरण्‍यास सांगितले. त्‍या बदल्‍यात आरंभी ऑनलाइन पद्धतीने काम दिले. ते पूर्ण झाल्‍यावर वेळोवेळी पैसे भरण्‍यास सांगून फसवणूक केली.


पावणेचार लाखांचे बेकायदेशीर ‘कफ सिरप’ जप्‍त

भिवंडी (जिल्‍हा ठाणे) – येथून पावणेचार लाखांचे कफ सिरप जप्‍त करण्‍यात आले आहे. दीड सहस्रांहून अधिक ‘कफ सिरप’च्‍या विविध आस्‍थापनांच्‍या बाटल्‍या यात आहेत. बेकायदेशीररित्‍या मोठ्या प्रमाणात ठेवलेल्‍या या बाटल्‍यांचा नशा येण्‍यासाठी उपयोग केला जात असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. १७ सहस्र ६४० बाटल्‍यांची १४७ खोकी पोलिसांनी कह्यात घेतली. या प्रकरणी ५ तरुणांना अटक केली आहे.


पुण्‍यात रात्री १२ नंतरही पब चालू

पुणे – मुंढवा एबीसी रोडवरील एका पबमधील धक्‍कादायक व्‍हिडिओ हा सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला आहे. रात्री १२ नंतरही येथे दोन गटांमध्‍ये तुंबळ हाणामारी झाली. यात ३ – ४ जणांची डोकी फुटली आहेत. या वेळेत पबमध्‍ये गर्दी असल्‍याचे दिसते. यामुळे रात्री १२ नंतरही पब चालू असल्‍याचे उघड झाले आहे.


महापालिकेचा लाचखोर अधिकारी अटकेत !

कल्‍याण – कल्‍याण-डोंबिवली महापालिकेच्‍या बाजार आणि परवाना विभागातील लिपीक प्रशांत धिवर यांना ठाणे लाचलुचपत विभागाच्‍या पथकाने ३१ जानेवारीला लाच घेतांना अटक केली. तक्रारदारांचा पालिकेच्‍या हद्दीत मटणाचा व्‍यवसाय आहे. याविषयीचा अर्ज स्‍वीकारण्‍यासाठी आणि हस्‍तांतरित करण्‍यासाठी धिवर यांनी ५० सहस्र रुपयांची लाच मागितली.

संपादकीय भूमिका : लाचखोरांची समाजात छी-थू झाली पाहिजे !


२ जणांवर वाघाचे आक्रमण

जुन्‍नर – येथील ओतूर परिसरातील गावांमध्‍ये बिबट्याची आक्रमणे होत आहेत. येथील २ वेगळ्‍या घटनांमध्‍ये बिबट्याने केलेल्‍या आक्रमणात २ जण घायाळ झाले आहेत. त्‍यापैकी एक जण घराबाहेरील अंगणात झोपले होते, तर एक जण गाडीवरून जात होते.