होळी-रंगपंचमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीची संस्कृती रक्षण मोहीम !

उपजिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला पाटबंधारे विभाग यांचे मोहिमेस सहकार्याचे आश्वासन !

पुणे, ११ मार्च (वार्ता.) – होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा बसावा, यासाठी पुणे येथे गेली २२ वर्षे सातत्याने आणि यशस्वीपणे चालू असलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या वर्षीही सर्वांच्या सहभागाने राबवण्यात येणार आहे. ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’चे यंदाचे हे २३ वे वर्ष असून १४ मार्च (धूलिवंदन) आणि १९ मार्च (रंगपंचमी) या दोन्‍ही दिवशी प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत खडकवासला जलाशयाच्‍या भोवती मानवी साखळी करून जलाशयाचे रक्षण करण्‍याकरता प्रबोधन करण्यात येणार आहे. या संदर्भात ५ आणि ६ मार्चला हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे खडकवासला पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहिमे’च्या २२ वर्षांच्या यशस्वीतेविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, सहाय्यक आयुक्त पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालय सिंहगड रस्ता, पोलीस निरीक्षक नांदेड सिटी, पुणे शहर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. ‘या अभियानात निश्चित सहकार्य करू’, असे त्यांनी सांगितले.