
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – करवीर तालुक्यातील उंचगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गावातील राजकीय, स्वच्छता कामगार, शिक्षिका, आधुनिक वैद्य, अंगणवाडीसेविका, आशा कामगार, पर्यावरणप्रेमी, महिला खेळाडू अशा महिलांचा सन्मानचिन्ह, फेटा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, ‘‘महिलांनी त्यांचे क्षेत्र कोणते आहे, ते न पहाता मी त्यामध्ये यशस्वी होणारच’, असा ठाम निश्चय करावा. त्यामुळे गृहिणीसुद्धा आपल्या घराला नीटनेटके ठेवून यशस्वी गृहिणी होऊ शकते.’’
महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, ‘‘झाशीच्या राणीने स्वराज्यासाठी लढाया केल्या. आपण ताराराणीच्या लेकी आहोत. आपण प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊच. स्रीशक्तीचा सन्मान वर्षातील ३६५ दिवस व्हावा.’’ या वेळी महिला उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत, स्वाती यादव, शरद माळी, संतोष चौगुले, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, अजित चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.
