‘एच्.एम्.पी.व्ही.’ची लक्षणे दिसल्यास घ्यावयाची खबरदारी

‘एच्.एम्.पी.व्ही.’ (‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’) या रोगाविषयी एक पत्रक सध्या व्हॉट्सॲपवर फिरत आहे. हा रोग आपल्यापर्यंत अजून पोचला नसला, तरी गेल्या महिन्याभरात त्रासदायक, पटकन बरे न होणारे खोकला-सर्दी रुग्ण वाढले आहेत, हे तर सध्या दिसून येत आहे. प्रत्येकाचे तसे ‘स्क्रिनिंग’ (पडताळणी) होत नसले आणि ‘व्हायरस स्ट्रेन’ (विषाणूचा प्रकार) कळत नसला, तरी आपल्या परीने आपण काळजी घेणे आवश्यक आहे. ‘प्राणघातक’ हा मुद्दा इथे आता गैरलागू असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करून कायमचे रचनात्मक / क्रियात्मक / प्राणघातक पालट होऊ नयेत, या दृष्टीने ‘त्रासदायक’ या मुद्याकडेही आरोग्याच्या दृष्टीने लक्ष देणे आवश्यक आहे. येथे देण्यात येणार्‍या सूचना साधारण सर्दी, खोकला आणि ‘कोविड’ महामारीसारख्याच आहेत. काही रुग्णांनी विचारणा केल्याने त्याच सूचना परत या निमित्ताने देत आहे.

१. लक्षणे दिसल्या दिसल्या स्वतःला घरातील इतर कुटुंबियांपासून वेगळे ठेवावे.

२. खोकतांना, शिंकतांना तोंडावर हात ठेवावा. एकत्र भेटणार असाल आणि स्वतःमध्ये अशी लक्षणे दिसत असल्यास लोकांमध्ये जाणे टाळावे. जाणे झाल्यासच इतरांपासून थोडे लांब राहून बोलणे, मुखपट्टीचा (‘मास्क’चा) वापर, स्वतःचा वापरलेला रुमाल इतरत्र न टाकणे, हे आवर्जून करावे.

३. कोमट पाण्यात हळद घालून गुळण्या कराव्यात. घसा दुखत असतांना कफ घशात साठून राहू नये, यासाठी कोमट पाणी प्यावे.

४. घशाला आणि तोंडाला आलेला कोरडेपणा दूर करण्यासाठी मनुका चघळाव्यात. घशात आग आणि खवखव अधिक असेल, तर सतत गरम पाणी प्यायला नको.

५. चिमूटभर सुंठ आणि हळद कोमट पाण्यात घालून सकाळ-संध्याकाळ घ्यावे.

६. रात्रीच्या वेळी हळद दूध पिऊ नये. साधारणतः कफ वाढवणारे पदार्थ जसे दूध, फळे, दही, शहाळे हे संध्याकाळ नंतर नको. आजारी असाल तर अजिबात नको. चिकटपणा, तसेच दाह वाढवणारे चीज, मेयो, लोणची, आंबवलेले आणि मैदा यांचे पदार्थ अजिबात खायला नको.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

७. पाण्याचा सततचा वाफारा घेतांना त्यातील पाणी घशात जाऊन तो त्रासदायक ठरतो. नाक चोंदणे, डोकेदुखी यांवर लेप, कोरडा शेक या पद्धतीचा वापर अधिक उपयोगी ठरतो.

८. मुलांना अशा वेळी फळे देणे टाळावे. कफ न्यून करणारी एकांगी ‘म्युकोलाईट कफ सिरप’ (एक प्रकारचे औषध) किंवा कुठलेच सिरप तपासणी न करता वा न विचारता देऊ नयेत. एकांगी कोरडेपणा वाढून त्रास वाढण्याची शक्यता रहाते. चाटण पद्धतीत दिलेल्या औषधांचा आणि वैद्यकीय सल्ल्याने घेतलेले काही काढे याचा चांगला उपयोग होतो.

९. ताप गेल्यावर येणारा थकवा न्यून रहावा, यासाठी लाह्या पाणी, खजूर पाणी प्यावे. केवळ ताप येऊन गेला असेल आणि सर्दी, खोकला नसेल, तर शक्ती भरून यायला फळांचे रस, डाळिंब रस, मनुका पाणी प्यायला हरकत नाही.

१०. थंडीच्या दिवसात मुलांना सकाळची शाळा असतांना सकाळीच अंघोळ करण्याविषयीचा अट्टाहास करायला नको.

आजाराची लक्षणे दिसल्या दिसल्या आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने लगेच औषधे चालू करावीत. सध्या बर्‍याच तापानंतर त्रासदायक कोरडा खोकला येणे, हे लक्षण दिसत आहे. ताप गेल्या गेल्या तात्काळ औषधे बंद न करता पूर्ण लक्षणे आटोक्यात येईपर्यंत काळजी घ्यावी.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (७.१.२०२५)