पौष शुक्ल अष्टमी (७.१.२०२५) या दिवशी श्रीमती नीता सुखटणकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. प्रणिता सुखटणकर यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्रीमती नीता सुखटणकर यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. कष्टमय जीवन जगणे
‘माझी आई श्रीमती नीता सुखटणकर (वय ७५ वर्षे) हिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तिला अनेक वर्षे पुष्कळ मानसिक संघर्ष सहन करावा लागला. देव आणि गुरु यांच्यावर असलेल्या तिच्या श्रद्धेमुळे ती कठीण प्रसंगांना सामोरे गेली. तिने कष्टमय जीवनाचा कधीही कंटाळा केला नाही.
२. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे
मागील ४ वर्षे आई घरीच असते. तिचा पाय पुष्कळ दुखत असल्यामुळे ती एकटी कुठेही जाऊ शकत नाही. तेव्हा आम्हाला वाटते, ‘तिला कंटाळा येत असेल’; पण तिने परिस्थिती आनंदाने स्वीकारली आहे. त्याबद्दल ती कधीही गार्हाणे करत नाही.
३. मुलींना साधनेत साहाय्य करणे
आईमुळे आम्ही ३ बहिणी साधनेत आलो. एकदा माझ्या मनाची स्थिती नकारात्मक होती. मी आईला म्हणाले, ‘‘मला साधना करणे कठीण वाटते. मला साधना जमणार नाही.’’ तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘तू साधनेचा मार्ग निवडला आहेस. आता पाठी फिरायचे नाही.’’ तेव्हा आईला गरोदरपणात पडलेले स्वप्न तिला आठवले. तिला स्वप्नात ‘होणारे बाळ सात्त्विक असेल’, असे दिसले होते. तेव्हा आईने मला चांगली साधना करण्यास आणि नामजपादी उपाय वाढवण्यास प्रोत्साहन दिले.
४. कठीण प्रसंगात स्थिर असणे
वर्ष २००६ मध्ये माझे वडील अकस्मात् रुग्णाईत झाले आणि त्यांचे रुग्णालयात निधन झाले. याविषयी आईला कळल्यावर ती पुष्कळ स्थिर होती. तेव्हा आईने ‘सर्वांनी रुग्णालयात न जाता घरी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करूया’, असे सांगितले. नंतर आम्ही सर्वांनी नामजप केला.
५. सेवाभाव
आई दिलेली सेवा मनापासून करते. ‘अजून काय सेवा करू शकतो ?’, असा तिचा विचार असतो.
६. गुरूंप्रती श्रद्धा असणे
आईची गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) पुष्कळ श्रद्धा आहे. आम्ही तिन्ही बहिणींनी लग्न केले नाही. याविषयी समाजातील लोक आईला विचारत असतात; पण आईला त्याचे काहीच वाटत नाही. आईने आमच्याकडून कधीही लग्न करण्याची अपेक्षा केली नाही. आई म्हणते, ‘‘माझ्या मुली साधनेच्या चांगल्या आणि योग्य मार्गाने जात आहेत.’’ काही वर्षांपूर्वी आईने गुरुदेवांना एका सत्संगात सांगितले होते, ‘‘माझ्या मुलींच्या लग्नाविषयी मला काळजी किंवा काहीच वाटत नाही.’’ तेव्हा गुरुदेवांनी तिचे कौतुक केले होते.
७. संतांप्रती भाव
आईमध्ये देव, संत आणि प.पू. गुरुदेव यांच्याप्रती भाव आहे. आमच्या घरी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आल्या होत्या. त्यांच्याविषयी आईच्या मनात भाव आहे. त्यानंतर आमच्या घरी देवघरात पालट जाणवतो. ती खोली अन्य खोल्यांच्या तुलनेत थंड वाटते.
आईमधील गुण माझ्या अंगी येऊ दे आणि आईची लवकर आध्यात्मिक प्रगती होऊ दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर, केरळ (४.९.२०२४)