मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण !
मुंबई – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अधिवक्ता उज्वल निकम यांची या प्रकरणी विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून नेमणूक करण्याविषयी मला निवेदन दिले आहे. या संदर्भात मी उज्ज्वल निकम यांना हा खटला घेण्यासाठी विनंती केली आहे. अधिवक्ता निकम यांच्याकडे अगोदरच काही खटले आहेत. आता या प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे त्यांनी एक-दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यांना होकार दिला, तर त्यांची नियुक्ती करू, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘केवळ प्रसिद्धीसाठी विरोधक काहीही आरोप करत आहेत. बीड येथील पोलीस ठाण्यात जे पलंग मागवण्यात आले, ते तेथील पोलिसांसाठी आहेत ! जे पोलीस अन्वेषणासाठी बाहेरून आले आहेत, त्यांना भूमीवर झोपवायचे का ? वाल्मिक कराड हा सरकारचा लाडका आरोपी असल्याचा आरोप विरोधक करत असून त्याच्यासाठी पलंग मागवल्याचा आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही.’’
घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी ही सगळ्यांची भूमिका ! – मंत्री धनंजय मुंडे
बीडची घटना अतिशय दुर्दैवी असून घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, हीच सगळ्यांची भूमिका आहे. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. या प्रकरणी कुणाचेही त्यागपत्र मागणे चालू आहे. या प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘मुंडे यांना बिनखात्याचा मंत्री करा’, अशी मागणी केली आहे. ‘बिनखात्याचे मंत्री कसे करता येते !’, हे शासनाने त्यांच्याकडून संपूर्ण माहिती करून घ्यावे. बीडच्या पालकमंत्रीपदाविषयी जो काही निर्णय असेल, तो आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील.