पणजी, २ जानेवारी (वार्ता.) – सामाजिक माध्यमांत प्रभाव टाकणार्या व्यक्ती गोव्यात पर्यटक उणावल्याचा खोटा प्रचार करत आहेत. वास्तविक गोव्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर मासांत पूर्वीप्रमाणेच अधिक पर्यटक आले अन् जानेवारी मासामध्येही अधिक पर्यटक येणार आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर मासांत बहुतांश हॉटेल पूर्ण क्षमतेने भरलेली होती. समुद्रकिनारे पर्यटकांनी भरलेले होते आणि रस्त्यावर वाहने मोठ्या प्रमाणात होती, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. सामाजिक माध्यमात यंदा नाताळची सुटी आणि ३१ डिसेंबरच्या कालावधीत गोव्यात पर्यटकांची संख्या अल्प झाल्याचे, गोव्यात रस्ते आणि समुद्रकिनारे रिक्त असल्याची माहिती छायाचित्रांसह प्रसारित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे स्पष्टीकरण दिले.
ते पुढे म्हणाले, ‘‘ सामाजिक माध्यमांत प्रभाव टाकणार्या व्यक्ती गोव्याची चुकीची प्रतिमा निर्माण करून लोकांची दिशाभूल करत आहेत. अशा व्यक्तींनी गोव्यात येऊन स्वत: समुद्रकिनार्यावरील गर्दी पहावी.’’
चालू हंगामात गोव्यात पर्यटकांची संख्या वाढली ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
पणजी – सामाजिक माध्यमांत प्रभाव टाकणार्या व्यक्ती गोव्याविषयी चुकीची माहिती देत आहेत, कारण त्यांना त्यासाठी पैसे मिळतात; मात्र यंदाचा नाताळ आणि नववर्ष हंगामात गोव्यात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, असा दावा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला आहे.