बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याचे प्रकरण
पणजी, २ जानेवारी (वार्ता.) – बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या प्रकरणी पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करतांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘इडी’ने) आणखी २० भूमींची कागदपत्रे कह्यात घेतली आहेत. ३१ डिसेंबर २००२४ या दिवशी भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील गोवा वेल्हा येथील आरोपी इस्टेवन डिसोझा आणि म्हापसा येथील आरोपी आलकांत्रो डिसोझा यांच्या घरांवर धाड घालून ही कागदपत्रे कह्यात घेण्यात आली.
‘इडी’ने भूमी बळकावल्याच्या प्रकरणी पैशांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी मागील वर्षी आसगाव येथील ८, तर हणजूण येथील ११ मिळून एकूण १९ भूमींची कागदपत्रे कह्यात घेतली आहेत. ‘इडी’च्या मते हा घोटाळा सुमारे ५३४ कोटीहून अधिक रुपयांचा आहे आणि ‘इडी’ने एप्रिल २०२४ मध्ये म्हापसा येथील विशेष न्यायालयात ३६ संशयितांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे.