कुडाळ – कोणत्याही प्रवाशाला तुम्ही भाडे नाकारू शकत नाही. भाडे नाकारल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रिक्शा व्यावसायिकांच्या बैठकीत सांगितले.
पोलीस वर्धापनदिनानिमित्त (‘रेझींग डे’निमित्त) शहरातील रिक्शा व्यावसायिकांची ही बैठक कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात झाली. या सभेमध्ये रिक्शा व्यावसायिकांच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी पोलीस निरीक्षक मगदूम यांनी वाचून दाखवल्या. कुडाल रेल्वेस्थानक येथे असलेले रिक्शा व्यावसायिक जवळचे भाडे नाकारतात. रात्रीच्या वेळी रेल्वेने येणार्या प्रवाशांना शहरात यायचे असेल, तर त्यांना रिक्शा मिळत नाही. यापुढे जर कुणी भाडे नाकारले, तर दंडात्मक कारवाई केली जाईल. या वेळी रिक्शा व्यावसायिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. यामध्ये ‘अनेक रिक्शा व्यवसायिक उर्मट आहेत, ते कुणाचे ऐकत नाहीत. त्यामुळे सर्व रिक्शा व्यावसायिकांचे नाव अपकीर्त होत आहे. काही रिक्शाचालक अनुज्ञप्ती नसतांनाही व्यवसाय करतात. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. रिक्शा उभ्या करायला जागा मिळत नाही’ आदी समस्यांचा समावेश होता.