‘मी वर्ष २०२१ पासून साधना चालू केली आणि गुरुकृपेने वर्ष २०२२ पासून मी पूर्णवेळ साधना करू लागले. मी साधनेत येण्यापूर्वीपासून आतापर्यंत अनुभवलेली गुरुकृपा कृतज्ञतापूर्वक गुरुचरणी अर्पण करते.
१. उच्च माध्यमिक विद्यालयात असतांना ‘लव्ह जिहाद’च्या फंदात अडकूनही गुरुकृपेने त्या सापळ्यातून बाहेर पडणे
मी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात असतांना मला काही वाईट अनुभव आले. मी अयोग्य व्यक्तींच्या संपर्कात आले आणि धर्मनिरपेक्षता अन् ‘लव्ह जिहाद’च्या फंदात अडकले, तरीही मला गुरुकृपेने ‘लव्ह जिहाद’च्या सापळ्यातून बाहेर पडता आले.
१ अ. साधिकेचा विश्वास बसण्यासाठी धर्मांध मुलीने हिंदु धर्माचे कौतुक करणे आणि साधिकेने आई-वडिलांनी सतर्क रहाण्यास सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करणे : महाविद्यालयात एका धर्मांध मुलीशी माझी मैत्री झाली. ती माझ्यासमोर हिंदु धर्माचे कौतुक करायची आणि मी तिला प्रसाद दिला, तर खायची. ती हिंदु मित्रांसमवेत देवळात जायची. त्यामुळे मला ती विश्वासू वाटली. मला माझ्या आई-वडिलांनी सतर्क रहायला सांगितले होते; परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केले.
१ आ. धर्मांध मुलीने ‘हिंदु धर्मातील कृती अयोग्य आहेत’, असे सांगून साधिकेला फसवण्याचा प्रयत्न करणे : काही दिवसांनी ती धर्मांध मुलगी मला त्यांच्या धर्मातील गोष्टी सांगू लागली. मला ‘हिंदु धर्मातील कृती कशा अयोग्य आहेत ?’, हे दाखवू लागली, उदा. कुंकू लावलेले तुला शोभत नाही, गळ्यातील दोरा चांगला दिसत नाही. एक दिवस ती मला म्हणाली, ‘‘माझ्या एका मित्राने तुमच्या धर्मातील मुलीशी लग्न केले आहे आणि ती आता पुष्कळ आनंदात आहे अन् तिला आता मांस खायला आवडते.’’ तेव्हा मला तिच्या उद्देशाची जाणीव झाली आणि मी तिच्यापासून दूर राहू लागले.
१ इ. धर्मांध मुले साधिकेला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यावर तिने त्यांच्यापासून दूर रहाणे : काही दिवसांनी मला इतर महाविद्यालयातील धर्मांध मुलांचे लघुसंदेश येऊ लागले. तेव्हा मला अंदाज आला, ‘माझा संपर्क क्रमांक कुणाद्वारे तरी इतरांना दिला गेला असेल.’ ती अडचण मी माझ्या स्तरावर सोडवली; परंतु काही दिवसांनी माझ्या महाविद्यालयातील एक धर्मांध मुलगा आमच्या मित्र-मैत्रिणींच्या गटात येण्यास इच्छुक असल्याचे दाखवू लागला. मला त्याच्याविषयी शंका आल्याने मी त्या गटात सहभागी होणे बंद केले; परंतु एके दिवशी मला काही शैक्षणिक कारणास्तव सर्वांशी बोलावे लागले. तेव्हा विषय पालटून तो धर्मांध इतर व्यावहारिक विषयांवर, तसेच मुलांविषयी मला प्रश्न विचारू लागला. मी त्याला टाळले आणि पुन्हा त्या गटात कधीच गेले नाही. काही दिवसांनी मला उलगडा झाला, ‘तो धर्मांध, म्हणजे त्या धर्मांध मुलीने उल्लेख केला होता तोच आहे आणि त्याने इतरांपासून त्याचे लग्न झाल्याचे लपवले असून तो ‘इतरांना त्याचे कुणाशी तरी लग्न जुळवून द्या’, असे सांगत होता.’
१ ई. साधिकेला हिंदु जनजागृती समितीच्या ‘लव्ह जिहाद’विषयी जागृतीचे आणि आई-वडिलांनी सतर्क करण्याचे महत्त्व लक्षात येणे : तेव्हा मला हिंदु जनजागृती समितीच्या ‘लव्ह जिहाद’विषयी जागृतीच्या कार्याचे महत्त्व लक्षात आले. माझ्या आई-वडिलांनी मला सतर्क केले नसते, तर ‘आज मी कुठे असते ?’, याचा विचार मी करू शकत नाही. ‘मी केवळ गुरुकृपेने सुरक्षित आहे’, हे आज माझ्या लक्षात येते.
२. स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात येऊन ते शिकणे आणि व्यष्टी साधना अन् सेवा यांतून आनंद मिळणे
या घटनांनंतर काही दिवसांनी युवकांसाठी एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. तिथे गेल्यावर मला ‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवले जाते’, असे कळले. मी त्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशिक्षण शिकले आणि त्या माध्यमातून मला सेवा मिळत गेल्या. मला प्रत्येक सेवेतून आनंद मिळायचा. ‘हिंदु राष्ट्र’ हे माझ्या जगण्याचे ध्येय बनले होते. काही कालांतराने आम्हा युवा साधकांना व्यष्टी साधना शिकवली गेली. तेव्हा लक्षात आले, ‘साधना केल्यावरच खरा आनंद मिळणार आहे’ आणि मला साधना करणे आवडायला लागले. आरंभी मी एक छंद म्हणून सेवा करत होते. आता भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न होत आहे. माझी अंतर्मुखतेकडे वाटचाल चालू झाली.
३. ‘साधनेतून खरा आनंद मिळतो’, हे गुरुकृपेने लक्षात आल्यावर वडिलांच्या प्रोत्साहनामुळे पूर्णवेळ साधना करू लागणे
मला पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जायचे होते. मात्र वडिलांनी ‘मी गोव्यातच शिक्षण घ्यावे’, असे मला सांगितले. तेव्हा माझ्या मनात पुष्कळ संघर्ष झाला. ‘मला अपेक्षित असे मिळाले नाही’, याविषयी चिंतन केल्यावर ‘शिक्षण इत्यादी अशाश्वत आहे आणि केवळ साधनाच आनंद देऊ शकते’, हे माझ्या लक्षात आले. मग मी ‘साधना कशी वाढवू शकते ?’, यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. माझ्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधिकेने मला ‘आनंदी जीवनासाठी साधने’चे महत्त्व लक्षात आणून दिले. तसेच माझ्या वडिलांनीही मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यामुळे मी व्यष्टी साधना शिकण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा निश्चय केला. ‘मी साधनेकडे वळण्यासाठी हा प्रसंग, म्हणजे गुरुदेवांची कृपाच आहे’, असे मला वाटते. (क्रमश:)
– एक साधिका, फोंडा, गोवा. (१४.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |