पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीमध्‍ये यापूर्वी गैरव्‍यवहार, भ्रष्‍टाचार केलेल्‍यांवर कारवाई करा ! – क्षत्रिय मराठा रिसायत फाऊंडेशन

प्रतिकात्मक चित्र

कोल्‍हापूर – पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान व्‍यवस्‍थापन समिती म्‍हणजे केवळ महामंडळ अथवा समिती नसून त्‍याच्‍याशी आम्‍ही हिंदूंच्‍या धार्मिक भावना जोडलेल्‍या आहेत. देवस्‍थान समितीमध्‍ये वर्ष २०१७ ते २०२१ या कालावधीत जो गैरव्‍यवहार, भ्रष्‍टाचार झाला आहे, त्‍याचे अन्‍वेषण करून सर्व संबंधित उत्तरदायींवर कारवाई करावी. या कालावधीत जे जे देवस्‍थान समितीवर होते, त्‍यांना परत कोणत्‍याच प्रकारची नियुक्‍ती देण्‍यात येऊ नये; अन्‍यथा आम्‍हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, अशा मागणीचे निवेदन ‘क्षत्रिय मराठा रिसायत फाऊंडेशन’च्‍या वतीने जिल्‍हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष यांना देण्‍यात आले.

जिल्‍हाधिकार्‍यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, देवस्‍थानाच्‍या अंतर्गत ३ सहस्र ६४ मंदिरांचा समावेश असून ३० सहस्र एकरहून अधिक भूमीचा समावेश आहे. देवस्‍थानाचे उत्‍पन्‍न कोट्यवधी रुपयांचे असून श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह हिंदूंच्‍या भावना धर्माशी जोडलेल्‍या आहेत. हिंदूंची मंदिरे ही हिंदूंसाठी प्रेरणास्रोत, उर्जास्रोत आहेत. त्‍यामुळे ज्‍यांनी पूर्वी गैरव्‍यवहार केले, त्‍यांना कोणत्‍याही प्रकारची नियुक्‍ती देण्‍यात येऊ नये; अन्‍यथा प्रसंगी आम्‍हाला न्‍यायालयात जावे लागेल. या निवेदनाची प्रत मुख्‍यमंत्री, विधी आणि न्‍याय विभागाचे सचिव यांना पाठवण्‍यात आली आहे. या प्रसंगी प्रसाद मोहिते, सौरभ पोवार, विशाल थोरवत, सागर चव्‍हाण, विपुल घाटगे, साईराज पाटील, सुयश पोवार, मनोज वायदंडे उपस्‍थित होते.

संपादकीय भूमिका :

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना हे लक्षात कसे येत नाही ?