अभिनेते नाना पाटेकर यांचे विधान !
मुंबई – माझे शरीर हे माझे शस्त्र आहे. ते नीट नसेल, तर कसे चालेल ? आपण आपले वाहन व्यवस्थित ठेवतो. ज्यांना व्यायामशाळेत जाता येत नाही, त्यांनी नियमित बैठका आणि सूर्यनमस्कार घातलेे पाहिजेत. मी अजूनही आधुनिक व्यायामशाळेतील आरशात व्यायामानंतर स्वत:चे शरीर बघतो. आरशात पहातांना प्रत्येकाला स्वतःचे शरीर आवडले पाहिजे; पण राजकीय मंडळींनी त्यांच्या घरातील आरसे फोडून टाकले असावेत. कधीतरी चुकून तहान लागल्यावर पाणी पितांना ते पाण्यात बघतील, तेव्हा ते प्रतिबिंब पाहिल्यानंतर त्यांना प्रश्न पडेल की, अरे, आपले माकड कधी झाले ? यांना कळत कसे नाही ? मरणार आहेत एक दिवस ! जाणार आहात तुम्ही एक दिवस, असे विधान अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
जनतेने राजकीय नेत्यांना आरसे दाखवले पाहिजेत !
ते म्हणाले, ‘‘त्यांनी (राजकारण्यांनी) आरसे फोडलेही असतील; पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना पुन्हा नव्याने आरसे दाखवायला पाहिजेत. ते आपल्या (जनतेच्या) हातात आहे. जेव्हा तुम्हाला कुठे विसंगती दिसली की, तुम्ही तिथे जा. जाळपोळ करा किंवा गाड्या तोडा, असे मी म्हणत नाही; पण तेथे जाऊन त्यांना (राजकारण्यांना) प्रश्न विचारा. राजकारणी जनतेला घाबरेनासे झाले आहेत. त्यांनी जनतेल पुन्हा घाबरायला पाहिजे. ते ज्या दिवशी सुरू होईल, त्या दिवशी परिस्थिती पालटेल.’’