१. सेवा करण्याची इच्छा होत नसतांना भ्रमणभाषवरील संत जनाबाई आणि श्री विठ्ठल यांचे चित्र दिसणे
‘३.११.२०२४ या दिवशी सकाळी नामजपादी उपाय करूनही संकलन सेवा करण्यास नकोसे वाटत होते. सेवेला आरंभ करण्यापूर्वी नामस्मरण केले, तरी मन इतस्ततः भटकत होते. त्यात मी नामस्मरण सोडून साधकांचे ‘व्हॉट्सअॅप’ वरील ‘स्टेटस’ पाहू लागलो. त्यात मला एका साधकाने ठेवलेले संत जनाबाई आणि श्री विठ्ठल दळण दळत असल्याचे चित्र पहायला मिळाले.
(‘व्हॉट्सअॅप’ या भ्रमणभाषमधील अनुप्रयोगावर (अॅप्लिकेशनवर) व्यक्ती वर्तमानात कोणत्या गोष्टी करत आहे, हे प्रत्येकाला चलचित्र, छायाचित्र किंवा लिखित स्वरूपात भ्रमणभाषवर ठेवता येते. त्याला ‘स्टेटस’ ही संज्ञा आहे. – संकलक)
२. गुरूंना सगुणासाठी प्रार्थना केल्यावर पू. शिवाजी वटकरकाका यांनी भ्रमणभाषवर ठेवलेले संत जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच चित्र पाहून ‘नामरूपी गुरु साहाय्य करतील’, हे लक्षात येणे
संत जनाबाई आणि श्री विठ्ठल यांचे चित्र पाहून मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘तुम्ही जनाबाईसाठी दळण दळले. माझ्या समवेत संकलन सेवा करण्यास या. नाहीतर मला काही सेवा करता येत नाही.’ तशी प्रार्थना करून मी सेवा आरंभ करणार एवढ्यात सनातन संस्थेचे १०२ वे समष्टी संत पू. वटकरकाका यांच्या ‘स्टेटस’ कडे माझे लक्ष गेले. त्यात लिहिले होते, ‘सगुणातील द्वैतातील विश्वास गुरूंवर असतो, तर निर्गुणाच्या, अद्वैताच्या जवळ नेणारा विश्वास नामावर असतो.’ या ओळी वाचून मला वाटले, ‘प.पू. डॉक्टर मला ‘नामाच्या रूपात मी सदैव तुझ्यासमवेत आहे’, असे सांगत आहेत.’ त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून मी सेवेला आरंभ केला आणि आश्चर्य म्हणजे काही मिनिटांपूर्वी मला जमत नसलेली सेवा मी करू शकलो.’
३. कृतज्ञता
किती धरावे पाय तुझे ।
देवा किती धरावे पाय ॥ १ ॥
सदैव असशी साधकां समवे ।
ब्रीद तुझे हे चिरकाली संगे ॥ २ ॥
शिकवण तुझी विसरतो मी ।
कधी येशी सत्वर मजसवे ॥ ३ ॥
पदोपदी सवे असशी ।
प्रार्थना करीता प्रगटशी ॥ ४ ॥
किती धरावे पाय तुझे ।
देवा किती धरावे पाय ॥ ५ ॥
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, गोवा. (३.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |