|
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याची जय्यत सिद्धता चालू आहे. योगी सरकार या महाकुंभाला ऐतिहासिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील गंगा नदीच्या काठावरील रसूलाबाद घाटाचे नाव पालटण्यात आले आहे. आता तो ‘शहीद चंद्रशेखर आझाद घाट’ म्हणून ओळखला जाईल. रसूलाबाद घाट हा प्रयागराजमधील सर्वांत जुन्या घाटांपैकी एक आहे. या घाटावर अमर हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते. आता महाकुंभाच्या आधी योगी सरकारने आदेश जारी करून या घाटाला क्रांतीकारकाचे नाव दिले आहे.
१. महानगरपालिकेने रसूलाबाद घाटाचे नाव पालटण्याचा ठराव नुकताच संमत केला होता. याविषयी महानगरपालिकेने अधिसूचना जारी केली होती.
२. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या प्रयागराज दौर्याच्या वेळी महाकुंभ मेळाव्याच्या सिद्धतेची पाहणी केली होती. या काळात त्यांनी दशाश्वमेध घाट आणि गंगा रिव्हर फ्रंट रोड यांची तपासणी केली होती. त्या वेळी त्यांनी रसूलाबाद घाटाचे नाव पालटण्याचे निर्देश दिले होते.
३. यापूर्वी उत्तरप्रदेशातील अलाहाबाद आणि फैजाबाद यांसारख्या मोठ्या शहरांचे नाव पालटण्यात आले होते. अलाहाबादला आता प्रयागराज आणि फैजाबादला आता अयोध्या म्हणून ओळखले जाते.
४. यासह मुगलसराय आणि झाशी या रेल्वे स्थानकांचे नाव पालटून अनुक्रमे पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर आणि वीरांगना लक्ष्मीबाई नगर असे करण्यात आले आहे.
५. यासह लक्ष्मणपुरी (लखनौ) विभागातील ८ रेल्वेस्थानकांची नावे पालटण्यात आली होती. यांमध्ये जैस, अकबरगंज, फुरसतगंज, वारिसगंज हॉल्ट, निहालगड, बानी, मिश्रौली आणि कासीमपूर हॉल्ट यांचा समावेश आहे. या सर्व रेल्वेस्थानकांना धार्मिक स्थळे, महान व्यक्ती आणि आध्यात्मिक गुरु यांची नावे देण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमान आक्रमणकर्त्यांची शहरे, गावे आणि अन्य स्थळे यांना देण्यात आलेली नावे पालटण्यासाठी आता केंद्र सरकारनेच देशात मोहीम हाती घ्यावी, अशीच राष्ट्रप्रेमींची इच्छा आहे ! |