Pandit Dhirendra Shastri Death Threat : कट्टरतावादी शीख बजिंदर परवाना याची पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांना ठार मारण्‍याची धमकी

शास्‍त्री यांच्‍या हरिहर मंदिराच्‍या संदर्भातील विधानाला अमृतसरच्‍या हरमंदिर साहिबशी (सुवर्णमंदिराशी) जोडले !

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री

अमृतसर (पंजाब) – पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांनी संभल येथील हरिहर मंदिराच्‍या संदर्भात केलेल्‍या विधानाला अमृतसर येथील सुवर्ण मंदिर म्‍हणजेच हरमंदिर साहिब याच्‍याशी जोडण्‍याचा प्रयत्न येथील शीख कट्टरतावादी बर्जिंदर परवाना याने केला. त्‍याने यावरून पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांना ठार मारण्‍याची धमकी दिली आहे. पंजाबमधील कपूरथला जिल्‍ह्यातील कादराबाद गावात एका सभेत परवाना याने ही धमकी दिली.

या प्रकरणी ‘अँटी टेररिस्‍ट फ्रंट इंडिया’ आणि विश्‍व हिंदु तख्‍त यांचे प्रमुख वीरेश शांडिल्‍य यांनी पोलिसांना ४८ घंट्यांच्‍या आत परवाना याला अटक करण्‍याची मागणी केली आहे. पोलिसांनी कारवाई न केल्‍यास याप्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालयात धाव घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

काय म्‍हणाला परवाना ?

बागेश्‍वर धामच्‍या साधूने ‘आम्‍ही हरमंदिरात पूजा करू’ असे विधान केले. अभिषेक करणार आणि मंदिर बांधणार. मी म्‍हणतो या; पण एक गोष्‍ट लक्षात ठेवा, आम्‍ही इंदिरा गांधी यांना मारले. त्‍यांना आत पाय ठेवण्‍याची अनुमती नव्‍हती. लाखोंचे सैन्‍य इथे आले आणि आम्‍ही ते गोळ्‍यांनी नष्‍ट केले. चंदीगडमधील बाँबस्‍फोटात गेला. (पंजाबचे माजी मुख्‍यमंत्री बिअंत सिंह बाँबस्‍फोटात ठार झाले होते) आजपासून तुमची उलटगणती चालू झाली आहे, याची बागेश्‍वरच्‍या बाबांनी नोंद घ्‍यावी. आम्‍ही तुमच्‍यावरही आक्रमण करू आणि आमच्‍या इच्‍छेनुसार आम्‍ही तुम्‍हाला मारून टाकू. तुम्‍ही या. हरमंदिर साहिब सोडा, बागेश्‍वरवर बाबांनी अमृतसर किंवा पंजाब येथे येऊन दाखवावे.

संपादकीय भूमिका

वडाची साल पिंपळाला जोडून हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेण्‍याचा हा प्रयत्न होत आहे का ?, याची चौकशी करणे आवश्‍यक आहे !