आगरतळा (त्रिपुरा) येथील खासगी रुग्‍णालयाने बांगलादेशी रुग्‍णांवर उपचार करण्‍यास दिला नकार

आगरतळा (त्रिपुरा) – बांगलादेशात अल्‍पसंख्‍य हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांनंतर कोलकाता येथील जे.एन्. रे रुग्‍णालयाने बांगलादेशातील रुग्‍णांवर उपचार न करण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर आता त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील आय.एल्.एस्. या खासगी रुग्‍णालयानेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशी नागरिकांना वैद्यकीय सेवा देऊ नयेत, या मागणीसाठी रुग्‍णालयाबाहेर हिंदूंकडून या संदर्भात निदर्शने करण्‍यात येत होती. त्‍यानंतर रुग्‍णालयाने हा निर्णय घेतला. मिळालेल्‍या माहितीनुसार प्रत्‍येक महिन्‍याला बांगलादेशातील कर्करोगाचे १०० हून अधिक रुग्‍ण या रुग्‍णालयात येतात.

बांगलादेशात भारतीय बसगाडीवर आक्रमण

बांगलादेशातील ब्राह्मणबरिया-विश्‍व मार्गावर भारतातील बसवर काही लोकांनी आक्रमण केले. ही बस आगरतळा येथून बांगलादेशमार्गे कोलकात्‍याला जात होती. त्रिपुराचे परिवहनमंत्री सुशांत चौधरी यांनी या आक्रमणाचा निषेध केला आणि त्‍वरित कारवाई करण्‍याची मागणी केली. एका ट्रकने बसला धडक दिली. त्‍याच वेळी बससमोर एक रिक्‍शा आली. या घटनेनंतर स्‍थानिकांनी भारतीय प्रवाशांना धमकावले, घोषणाबाजी केली आणि प्रवाशांना ठार मारण्‍याची धमकीही दिली. या घटनेनंतर बसमधील प्रवासी घाबरले होते, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

त्रिपुराचे मुख्‍यमंत्री माणिक साहा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्‍हणाले की, बांगलादेशात हिंदूंवर कसा अत्‍याचार होत आहेत हे संपूर्ण जग पाहत आहे. त्रिपुरा ३ बाजूंनी बांगलादेशाने वेढलेले असल्‍याने सीमा सुरक्षा दलाला आणि पोलिसांना आंतरराष्‍ट्रीय सीमेवर कडक पहारा ठेवण्‍याचे निर्देश दिले आहेत.

संपादकीय भूमिका

जे देशातील जनता करू लागली आहे, तेच आता भारत सरकारने करणे आवश्‍यक आहे. भारत सरकारने आता पाकिस्‍तानप्रमाणेच बांगलादेशासमवेतचे सर्व संबंध तोडून त्‍याच्‍यावर दबाव निर्माण करून हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी पाऊल उचलावे !