RSS On Attacks Against Bangladeshi Hindus : हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी केंद्र सरकारने जागतिक जनमत निर्माण करावे !

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे विधान

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

नवी देहली – बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. केंद्र सरकारनेही जागतिक मत सिद्ध करून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी योग्‍य ते प्रयत्न करावेत. त्‍याच वेळी, यासाठी प्रभावी जागतिक संघटनांचे साहाय्‍य घेतले पाहिजे. या संकटकाळात भारत, जागतिक समुदाय आणि संस्‍था यांनी बांगलादेशातील पीडितांसमवेत उभे राहिले पाहिजे. जागतिक शांतता आणि बंधुभाव यांसाठी हे अतिशय महत्‍वाचे आहे, अशी प्रतिक्रिया राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी बांगलादेशातील स्‍थितीविषयी व्‍यक्‍त केली आहे. बांगलादेशातील शांततापूर्ण निदर्शनांमध्‍ये हिंदूंचे नेतृत्‍व करणार्‍या चिन्‍मय प्रभु यांना कारागृहात पाठवणे अन्‍यायकारक असून त्‍यांची त्‍वरित सुटका करण्‍याची मागणीही होसबाळे यांनी केली.

सरकार्यवाह होसबाळे पुढे म्‍हणाले की,

१. बांगलादेशातील हिंदू, महिला आणि इतर सर्व अल्‍पसंख्‍य यांच्‍यावर इस्‍लामी कट्टरतावाद्यांकडून होणारी आक्रमणे, हत्‍या, लूटमार आणि जाळपोळ यांसारख्‍या घटना, तसेच अमानवी अत्‍याचार अत्‍यंत चिंताजनक आहेत. राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघ याचा निषेध करतो.

२. हिंसाचार करणार्‍या लोकांना रोखण्‍याऐवजी बांगलादेशाचे अंतरिम सरकार आणि इतर संस्‍था गप्‍प आहेत. स्‍वसंरक्षणासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवणारा हिंदूंचा आवाज दडपण्‍यासाठी बांगलादेशात त्‍यांच्‍यावर अन्‍याय आणि अत्‍याचार यांची नवी फेरी चालू  होतांना दिसत आहे.