Pro-Khalistani Claim Over Canada : कॅनडातील गोर्‍या लोकांनी युरोपला चालते व्हावे ! – खलिस्तान समर्थकाचा व्हिडिओ

स्थानिक पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी व्हिडिओ केला प्रसारित

ओटावा (कॅनडा) – कॅनडात रहाणार्‍या हिंदूंना लक्ष्य करणारे खलिस्तानी आता तेथील गोर्‍या लोकांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. खलिस्तान्यांच्या एका मोर्चाच्या वेळी खलिस्तान समर्थक ‘गोर्‍या लोकांनी युरोप अथवा इस्रायल येथे चालते व्हा’, अशा प्रकारे सांगत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. सरे शहरातील ही घटना असून पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून हा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

१. या व्हिडिओत शेकडो लोक खलिस्तानी झेंडे घेऊन दिसत आहेत. एक व्यक्ती या मोर्चाचा व्हिडिओ बनवत असून म्हणत आहे की, ‘मी कॅनडाचा मालक आहे आणि आम्हाला कॅनडियन असल्याचा अभिमान आहे. गोर्‍या लोकांनी युरोप आणि इस्रायल येथे परत जावे; कारण ते खरे कॅनेडियन नसून कॅनडा आमचा आहे.’

२. डॅनियल बोर्डमन यांनी या व्हिडिओसमवेत पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारला काही महत्त्वाचे प्रश्‍न विचारले आहेत. ‘असे मोर्चे काढण्यास अनुमती कशी दिली जाते ? अशा मोर्चांचा परराष्ट्र धोरणावर होणार्‍या परिणामाकडे आपण डोळेझाक कसे करू शकता ? यातून परराष्ट्र धोरणासाठी धोकादायक स्थिती निर्माण होणार नाही का ?’, असे प्रश्‍न बोर्डमन यांनी केले आहेत.

३. याआधीही बोर्डमन यांनी खलिस्तानच्या सूत्रावरून ‘ट्रुडो आणि त्यांच्या सरकारला कॅनडाच्या सुरक्षेची चिंता नाही’, असे म्हटले होते.

संपादकीय भूमिका

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे त्यांची सत्ता वाचवण्यासाठी भारतावर बेछूट आरोप करत खलिस्तान्यांना पाठीशी घालत आहेत. आता त्यांना हे आवाहन मान्य आहे का ? कॅनडातील लोकांना हे मान्य आहे का ? ते ट्रुडो यांच्यावर खलिस्तानींवर कारवाई करण्यास भाग पाडतील का ?