‘कर्तेपणा’ आणि ‘अकर्तात्मयोग’ यावर होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांचे झालेले चिंतन

‘माझ्यातील ‘कर्तेपणा’ हा अहंचा पैलू लक्षात आल्यानंतर मी तो घालवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. हा अहंचा पैलू माझ्या आध्यात्मिक प्रगतीतील मोठा अडथळा असल्याने त्या संदर्भात मी दळणवळणबंदीच्या काळात अभ्यास करू लागलो. त्या वेळी कर्तेपणाच्या पैलूंविषयी माझ्यातील अनेक सूत्रे मला अभ्यासण्यास मिळाली. त्याचा मला अहं-निर्मूलनासाठी पुष्कळ लाभ होत आहे. ‘या सूत्रांचा लाभ इतरांनाही व्हावा’, यासाठी मी ती सूत्रे पुढे मांडत आहे.

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

१. मनुष्याच्या कर्तेपणाचे दृश्य स्वरूप म्हणजे ‘मी केले, तर होईलच’, असा वृथा अभिमान असणे 

या जगाचा नियंता ईश्वर आहे. त्याच्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही. ‘सर्व काही तोच करतो’, हे आपल्याला संत आणि ऋषिमुनी अनेक युगांपासून सांगत आहेत, तरीसुद्धा ‘मी केले, तर होईल’, असा खोटा अभिमान मनुष्याला असतो. ‘अगदी क्षुल्लक कर्मसुद्धा आपल्या हातून पार पडेलच’, अशी निश्चिती कुणालाही नसते. प्रत्यक्ष हे अनुभवत असूनही ‘मी केले, तर होईलच’, असा वृथा अभिमान मनुष्यामध्ये असतो. हेच त्याच्या कर्तेपणाचे दृश्य स्वरूप होय.

२. देहबुद्धी अधिक असलेल्या व्यक्तीच्या कर्तेपणाची लक्षणे

२ अ. लोकेषणा असलेली व्यक्ती कामक्रोधादी विकारांना बळी पडून सतत भीती अन् काळजी यांनी त्रस्त असणे : व्यक्ती देहाला सर्वस्व मानते. ती मान, प्रतिष्ठा आणि मोठेपणा यांसाठी धडपड करत असते. ती आपले सत्कर्म आणि विद्वत्ता यांचा डांगोरा जगामध्ये पिटते. ‘लोकांनी आपले ऐकावे अन् आपल्याला चांगले म्हणावे’, अशी त्या व्यक्तीची अपेक्षा असते. त्या व्यक्तीला दुसर्‍याचा उत्कर्ष सहन होत नाही. ‘आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळालेच पाहिजे’, असा त्या व्यक्तीचा अट्टहासही असतो. त्यामुळे ती कामक्रोधादी विकारांना बळी पडते. लोकांची निंदा करतांना तिला आनंद होतो. अशी व्यक्ती सतत भीती आणि काळजी यांनी त्रस्त असते.

२ आ. पैशाच्या हव्यासापोटी व्यक्ती दुराचारी बनणे आणि ‘विकारांचे दास्यत्व, तसेच द्रव्याचा लोभ’, या लक्षणांनी तिच्यातील अहंकार लक्षात येणे : देहबुद्धी अधिक असल्यामुळे ‘वासना तृप्त झाल्यावर आपल्याला सुख आणि समाधान मिळेल’, असे त्या व्यक्तीला वाटते. देह सुस्थितीमध्ये रहावा, यासाठी ती पैशाच्या मागे लागते; कारण ‘पैशाने सर्व सुखसोयी मिळतात’, असा तिचा (अप) समज असतो. पैशाच्या हव्यासापोटी दुराचार केल्याने ती शीलभ्रष्ट आणि कर्तव्यभ्रष्ट होते. तिला नीतीधर्माचे बंधन रहात नाही. एकंदरीतच ‘विकारांचे दास्यत्व, द्रव्याचा लोभ आणि मनाची हाव’, अशा कर्तेपणाच्या लक्षणांवरून तिच्यातील अहं लक्षात येतो.

३. मनुष्याच्या अज्ञानातून निर्माण झालेला कर्तेपणाचा अहंकार !

३ अ. जीवनातील कोणतीच गोष्ट स्वाधीन नसून ‘व्यक्तीतील कर्तेपणाचा अभिमान’ हे तिच्या असमाधानाचे कारण असणे : व्यक्तीतील ‘कर्तेपणाचा अभिमान’, हा भ्रम असून तेच तिच्या असमाधानाचे कारण आहे. जीवनातील कोणतीच गोष्ट व्यक्तीच्या स्वाधीन नाही. ‘जन्म कुठे, कुणाच्या पोटी आणि कशा अवस्थेमध्ये व्हावा ? नातेवाईक, शेजारी आणि मित्र कोण आणि कसे असावेत ? धर्म, सांपत्तिक स्थिती आणि संस्कृती कशी असावी ?’, यांपैकी काहीही व्यक्तीच्या हातामध्ये नसते.

३ आ. मनुष्य स्वतःचे जीवन अज्ञानानेच जगत असल्याने त्यातूनच भ्रम निर्माण होत असणे : प्रतिदिन घडणार्‍या घटना आपल्या हातामध्ये नसतात. ‘त्या तशा का घडत आहेत ?’, ते समजण्याच्या पलीकडे असते. ‘मनुष्याचे मरण हे जरी निश्चित असले, तरी ते केव्हा, कुठे अन् कसे येणार आणि मृत्यूनंतर तो कुठे जाणार ?’, हे त्याला ठाऊक नसते. ‘त्याच्या वाट्याला सुख किंवा दुःख यांचे प्रसंग का येतात ?’, तेही त्याला समजत नाही, म्हणजेच मनुष्य आपले जीवन अज्ञानानेच जगत असतो आणि त्यातूनच भ्रम निर्माण होत असतो.

४. ‘अकर्तात्मयोग’ म्हणजे काय ? 

‘कर्माच्या फळाची इच्छा न करता केलेले कर्म’, म्हणजे अकर्मकर्म. त्यालाच ‘अकर्तात्मयोग’, असे म्हणतात. याविषयी भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४७

अर्थ : तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही; म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस, तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.

४ अ. ‘कर्तेपण आणि अकर्तेपण’ हे कर्माच्या हेतूवर अवलंबून असणे : ‘मी कर्ता नाही’, हे लक्षात घेऊन वागणे, हा ‘अकर्तात्मयोग’ होय. अकर्तेपण, म्हणजे कर्म सोडून देणे नाही आणि आपण तसे करूही शकत नाही. कर्तेपण आणि अकर्तेपण हे कर्माच्या हेतूवर अवलंबून असते.

‘दृश्य किंवा देह यांच्या माध्यमातून सुख मिळावे’, हा एक हेतू, तर ‘अंतःस्थ भगवंतापासून सुख मिळावे’, हा दुसरा हेतू असतो. पहिल्या प्रकारामध्ये ‘अमुक एक फळ मिळावे’, या हेतूने कर्म केले जाते; परंतु फळ मिळणे, न मिळणे आपल्या हातामध्ये नसल्याने मनाची घालमेल सतत चालू असते.

दुसर्‍या प्रकारामध्ये ‘कर्म करून काही मिळवायचे नसते किंवा कर्म न करून काही गमवायचे नसते.’ जीवनामध्ये जे आंतरिक समाधान मिळवायचे असते, ते त्या व्यक्तीला अगोदरच प्राप्त झालेले असते.

४ आ. कर्तेपण आणि अकर्तेपण यांतील भेद

४ इ. कर्तेपणावर मात करण्यासाठी ‘सर्वकाही ईश्वर करतो’, हे मनावर बिंबवण्यासाठी स्वयंसूचनांची सत्रे करणे आवश्यक ! : परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मोक्षापर्यंत जाण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवले गेले आहे. या कलियुगात ‘आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे, हाच मूळ पाया आहे’, असे मला वाटते. याचे मूल्य जाणवल्यामुळे परात्पर गुरुदेवांप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त होते.

‘हे गुरुदेवा, अंतःकरण शुद्ध करून घेण्यासाठी आम्ही अनन्यभावे आपल्या चरणी शरण आलो आहोत. आपणच आम्हा साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आम्हाला अंतर्बाह्य शुद्ध करा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, फोंडा, गोवा.