Jagadguru Shri Rambhadracharya Slams Congress : ‘उडाणटप्पू आणि गुंड यांनीच राजकारण करावे’, असे कुठे लिहिले आहे ?

  • काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या पोषाखावर टीका केल्याचे प्रकरण

  • सूटा-बूटांत वावरणार्‍यांनी भारतात राजकारण न करण्याचा सल्ला !

जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज

चित्रकूट (उत्तरप्रदेश) – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या पोषाखावर टीका केली होती. यावर जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले ‘‘केवळ उडाणटप्पू (लोफर्स) आणि गुंड यांनीच राजकारण करावे’, असे कुठे लिहिले आहे ? भगवा धारण करणार्‍यांनी राजकारणात उतरले पाहिजे. भगवा हा देवाचा रंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोच भगवा झेंडा फडकावला आणि संपूर्ण देश आणि महाराष्ट्र यांना एकजूट केले. सूटा-बूटांत वावरणार्‍यांनी भारतात राजकारण करू नये.’’

मुंबईत झालेल्या ‘संविधान बचाव’ परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले होते, ‘‘अनेक नेते साधूंच्या वेशात रहातात आणि आता राजकारणी झाले आहेत, अगदी मुख्यमंत्रीही झाले आहेत. ते ‘भगवे’ कपडे घालतात आणि त्यांच्या डोक्यावर केस नसतात. मी भाजपला सांगेन की, एकतर पांढरे कपडे घाला किंवा तुम्ही संन्यासी असाल आणि भगवे कपडे परिधान करत असाल, तर राजकारणातून बाहेर पडा.’’

खर्गे यांनी नुकतेच झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेमध्ये सांगितले की, खरा योगी ‘फटकेबाजी’ सारखी भाषा वापरू शकत नाही. ही  भाषा आतंकवादी वापरतात.