पैसेवाटप करणारी चारचाकी रोखली !
नाशिक – नांदगावमध्ये पैसे वाटप करणारी चारचाकी अपक्ष उमेदवार रोहन बोरसे यांच्या कार्यकर्त्यांनी रोखली. या वेळी चालक पळून गेला. ती चारचाकी कुणाची आहे, याचा शोध घेतला जात आहे.
पैशाच्या पाकिटांसह काँग्रेस कार्यकर्त्यांना पकडले
नागपूर – मध्य नागपुरातील नाईक तलाव, बांगलादेश परिसरात काँग्रेसच्या कार्यालयात पैशाच्या पाकिटांसह कार्यकर्त्यांना पकडल्याचा आरोप भाजपने केला. पोलिसांनी एकाला कह्यात घेऊन पैशाची १० पाकिटे जप्त केली. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू होती.
मुंबईत मतदान सुविधेत गोंधळ !
मुंबई – येथे अनेक मतदारांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठी पोचलेली नसल्याने मतदान केंद्रात गेल्यावर अनेकांना अनुक्रमांक आणि नाव मतदारसूचीत शोधावे लागले. अनेकांना त्यांचे मतदान केंद्र पालटले असल्याचे ऐनवेळी समजले. त्यामुळे एका दिव्यांग महिलेला एका मतदान केंद्रावरून दुसर्या मतदान केंद्रापर्यंत चालत जावे लागले.
संपादकीय भूमिका : मतदानाच्या दिवशीच जनतेची ससेहोलपट करणारे लोकप्रतिनिधी सुराज्य कसे देणार ?
वर्धा येथे मारहाण !
वर्धा – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तर यांंना मारहाण झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी कराळे मास्तरांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
मेळघाटातील ६ गावांचा मतदानावर बहिष्कार !
अमरावती – मेळघाटातील रंगूबेली, धोकडा, कुंड, किन्हीखेडा, खोकमार आणि खामदा या ६ गावांमधील १ सहस्र ३०० नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. गावात रस्ते, पाणी, नाले, वीज या समस्या न सुटल्याने नागरिकांनी हा निर्णय घेतला.
संपादकीय भूमिका : मूलभूत समस्या न सोडवणार्या लोकप्रतिनिधींवर जनतेचा विश्वासच राहिला नाही, हेच यातून लक्षात येते !
रामनगर (छत्रपती संभाजीनगर) येथील गावकर्यांचा बहिष्कार !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रामनगर येथे स्मशानभूमी, दफनभूमी यांसह गावात पायाभूत सुविधा नसल्याने गावकर्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. (ग्रामस्थांना असा निर्णय घ्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! आता तरी प्रशासन गावकर्यांना सुविधा देणार का ? – संपादक) गावातील एकही ग्रामस्थ मतदान करण्यासाठी आला नाही. रामनगर येथे २६ वर्षांपासून या गावात स्मशानभूमी आणि दफनभूमी नाही. नगररचनेप्रमाणे स्मशानभूमी आणि दफनभूमी जागा गावाच्या कह्यात देण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.