पणजी, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘ऑनलाईन’ वेश्याव्यवसायाचा गोव्यातील ग्रामीण भागालाही विळखा पडला आहे. वेश्याव्यवसायावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ‘एस्कॉर्ट सर्व्हिसीस’च्या (वेश्याव्यवसायाच्या) विज्ञापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. या विज्ञापनांमध्ये गोवा हे ‘नॉटी फन’ (मौजमजा) करण्याचे ठिकाण असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि यामध्ये ‘एस्कॉर्ट’ (युवती किंवा महिला) यांचे छायाचित्र, नाव आणि संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.
पूर्वी राज्यात वेश्याव्यवसाय पर्यटन स्थळांपुराता मर्यादित होता; मात्र याचा विळखा आता इतर गावांनाही पडला आहे. आता यामध्ये डिचोली, सांगे, वाळपई आणि काणकोण या गावांचाही समावेश झालेला आहे. या क्षेत्रातील एका संकेतस्थळाला ‘व्ही.आय.पी. एस्कॉर्ट गर्ल’, असे नाव देण्यात आले आहे आणि यामध्ये ‘साऊथ गोवा एस्कॉर्ट’, ‘हणजूण एस्कॉर्ट’, ‘बागा बीच एस्कॉर्ट’, ‘वाळपई एस्कॉर्ट’, आदी विभाग पाडण्यात आले आहेत. विज्ञापनामध्ये गोव्याविषयी पुढील माहिती लिहिली आहे. ‘‘गोवा हा देशातील एक क्रियाशील प्रदेश आहे आणि या ठिकाणी मौजमजेविना एकही रात्री जाऊ शकत नाही.
‘गोवा एस्कॉर्ट सर्व्हिस’मध्ये आपले स्वागत आहे आणि आम्ही तुम्हाला उच्च दर्जाच्या ‘मॉडेल’ उपलब्ध करून देऊ.’’ अशा स्वरूपाच्या अनेक विज्ञापनांमध्ये रशियाच्या महिलेची छायाचित्रे अधिक प्रमाणात प्रसारित करण्यात आली आहेत आणि ‘ही रशियाची महिला ‘ट्रॅव्हल गाईड’ (वाटाड्या) म्हणून समवेत येऊ शकते’, असे म्हटले आहे. अन्य एक संकेतस्थळ ‘पिंक गोवा डॉट इन’ विनामूल्य घरपोच सुविधा उपलब्ध करणार असल्याचे म्हटले आहे. ‘मिसमेडिसन’, ‘डेट टू नाईट’, ‘वीवास्ट्रीट’, ‘वॉक गर्ल्स सेफ’ आदी संकेतस्थळांनी ‘वेश्याव्यवसाय उपलब्ध असलेले पर्यटनस्थळ’, अशा स्वरूपात गोव्याची अपकीर्ती केली आहे.
गोवा पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने हल्लीच वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणारी संकेतस्थळे शोधून काढून ती ‘माहिती तंत्रज्ञान कायदा २०००’च्या आधारे बंद करणार असल्याचे म्हटले होते; मात्र वर्ष २०१७ मध्ये केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गोवा पोलिसांचा संबंधित संकेतस्थळे बंद करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. सद्यःस्थितीत पोलिसांनी गोव्यात अशा स्वरूपाची ९० संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांतील मंच (सोशल मिडिया प्लॅटफॉर्म) शोधून काढले आहेत.
कारवाई करण्यासाठी पोलिसांना पुरेशा प्रमाणात माहिती पुरवली आहे ! – अरुण पांडे, संचालक, ‘अन्याय रहित जिंदगी’
आम्ही हा प्रश्न संबंधितांसमोर अनेक वेळा मांडला आहे. यासंबंधी अहवालही सादर करण्यात आले आहेत. पोलिसांना कारवाई करण्यासाठी पुरेशा प्रमाणात माहिती पुरवली आहे. गोव्यात वेश्याव्यवसाय ‘ऑनलाईन’ आणि प्रत्यक्ष स्वरूपात होत असताे. ‘अन्याय रहित जिंदगी’ ही अशासकीय संस्था या व्यवसायातून बाहेर पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करते. वेश्याव्यवसायाचे जाळे मोडून काढण्याचे
काम पोलिसांचे आहे.
संपादकीय भूमिकागोव्याची अपकीर्ती करणार्या या संकेतस्थळांवर त्वरित बंदी न घातल्यास राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी बंदीसाठी पाठपुरावा करणे आवश्यक ! |