|
फोंडा (गोवा), ७ नोव्हेंबर (वार्ता.) – माशेल येथील दीपश्री सावंत गावस हिने ‘पैसे घेऊन सरकारी नोकरी देतो’, असे आमीष दाखवून ४४ जणांकडून अंदाजे ३ कोटी ८८ लाख रुपये घेतले असल्याची तक्रार म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार दीपश्री हिच्याविरुद्ध उसगाव आणि सावर्डे, अशा दोन ठिकाणांहून पैसे घेऊन नोकरी देण्याचे आमीष दाखवून पैसे लुटल्याची तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. या प्रकरणी दीपश्री सावंत हिला फोंडा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. त्यानंतर आता माशेल येथील संदीप जगन्नाथ परब यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी दीपश्रीने ४४ जणांकडून एकूण ३ कोटी ८८ लाख रुपये घेतले असून पैसे पोचले, तरी नोकरी दिली नसल्याची तक्रार प्रविष्ट केली आहे.
त्याने या तक्रारीमध्ये म्हटले आहे, ‘‘नोकरी न मिळाल्याने लोक माझ्याकडे तगादा लावत आहेत आणि मला धमकी देत आहेत. (याचा अर्थ परब हेही या भ्रष्टाचारात सहभागी आहेत, असा होतो. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हायला नको का ? – संपादक) राज्यातून विविध ठिकाणच्या सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांकडून हे पैसे संबंधीत गावातील काही जणांनी एकत्र केले आणि माझ्याकडे आणून दिले. मी ते पैसे दीपश्रीला दिले. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत हे पैसे गोळा करण्यात आले होते.’’
ही तक्रार दाखल करण्यासाठी संदीप परब यांना अधिवक्ता शैलेश गावस यांचे सहकार्य मिळाले. संदीप परब यांनी म्हटले आहे, ‘‘दीपश्रीने पुष्कळ मालमत्ता, महागड्या गाड्या, सदनिका, सोन्याचे दागिने इत्यादींची खरेदी केली आहे. हे सर्व लोकांकडून घेतलेल्या पैशांमुळे शक्य आहे. मी घरातील सोने आणि मौल्यवान वस्तू विकून सुमारे ८० लाख रुपये काही जणांना परत केले आहेत; मात्र दीपश्रीकडून एक पैसाही परत देण्यात आलेला नाही.’’ या प्रकरणी अधिवक्ता शैलेश गावस म्हणाले, ‘‘नोकरीसाठी पैसे दिलेले बहुतांश लोक सर्वसामान्य वर्गातील असून त्यांचे पैसे लुटणार्या दीपश्री हिला मी सोडणार नाही. या प्रकरणी न्यायालयात दाद मागू आणि पैसे परत मिळवू.’’
संपादकीय भूमिकासरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे घेणार्यांएवढेच पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवू पहाणारेही दोषी आणि भ्रष्टाचारी आहेत ! |