सोलापूर – मधुरिमाराजे या छत्रपतींच्या स्नुषा असतांना कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारीचे आवेदन मागे घेतांना त्यांच्या चेहर्यावर जे अगतिकतेचे भाव होते, ते बघून या राज्यातील प्रत्येक बाई आतून हलली असणार. संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले की, छत्रपतींच्या सूनबाईंना कशा प्रकारची वागणूक देण्यात आली. कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार सतेज तथा बंटी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘गादीचा मान’ म्हणून प्रचार केला आणि त्याच परिवारातील एका महिलेला उद्देशून ‘दम नव्हता, तर उभे कशाला राहिला ?’, अशा पद्धतीची भाषा वापरली. त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यातील मधुरिमाराजे यांचा सतेज पाटील आणि घरातील लोकांनी जो अवमान केला, तो सगळ्यांसाठी वेदनादायी आहे, असे मत भाजपच्या आमदार सौ. चित्रा वाघ यांनी केले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘सर्वसामान्य घरातली बाईपण म्हणत होती, आमच्या नवर्याचीसुद्धा अशी हिंमत नाही की, आम्हाला असा हात धरून खेचून आणायची. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे; परंतु ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली गेली, ती वेदनादायी होती. या प्रसंगात ‘बंटी (आमदार सतेज पाटील) यांची घंटी कुणी वाजवली’, हे त्यांना आता शोधावे.
सौ. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, सोलापूर दक्षिणचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख हे केवळ राजकारणी नसून ते समाजकारणी आहेत. ज्यांना कुणीच नाही आहे अशा आई-वडिलांना भोजनाचा डबा पोचवण्यापासून सामूहिक विवाहांपर्यंत विविध समाजोपयोगी कार्यक्रम ते करतात. या सगळ्या त्यांच्या कामाची मी साक्षीदार आहे.