पैंगीण, काणकोण येथील व्यक्तीची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील संशयित कह्यात
पणजी, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – सरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळण्याचे पूजा नाईक हिचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर माशेल, डिचोली, जुने गोवे आदी ठिकाणची अशा स्वरूपाची प्रकरणे उघडकीस आली होती. यामध्ये आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. पैंगीण, काणकोण येथील एका व्यक्तीला नोकरीचे आमीष दाखवून त्याच्याकडून ५ लाख रुपये उकळल्याची तक्रार पैंगीण, काणकोण येथील युवक कृष्णा नाईक यांनी वर्ष २०२० मध्ये काणकोण पोलिसात प्रविष्ट (दाखल) केली होती; मात्र पोलिसांनी त्या वेळी या तक्रारीची नोंद घेतली नाही. आता काणकोण पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक हरिश राऊत देसाई यांनी प्रलंबित तक्रारीची नोंद घेऊन संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आणि रामेश्वर मांद्रेकर या संशयितास कह्यात घेतले आहे. नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळण्याचे हे काणकोण येथील मागील २ आठवड्यांमधील दुसरे प्रकरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार संशयित रवीन भंडारी (रहाणारा पोळे, काणकोण) आणि रामेश्वर मांद्रेकर (रहाणारा सांखळी) यांनी पोलीस खात्यात नोकरी देण्याचे आमीष दाखवून ५ लाख रुपये उकळले होते. रवीन भंडारी हा सरकारी नोकरीत आहे. यापूर्वी २७ ऑक्टोबर या दिवशी काणकोण पोलिसांनी नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या अन्य एका प्रकरणी मिथिल च्यारी (महालवाडा, पैंगीण), प्रीतेश च्यारी (इदर, लोलये) आणि पराग रायकर (मडगाव) यांना कह्यात घेतले होते. सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी देण्याचे आमीष दाखवून या तिन्ही संशयितांनी निशा च्यारी यांच्याकडून १५ लाख रुपये उकळल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती.
आता पूजा नाईक हिला पर्वरी पोलिसांनी घेतले कह्यात
पणजी – सरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याचे पर्वरी येथील एक प्रकरण आता उघडकीस आले आहे. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी पूजा नाईक हिला कह्यात घेतले आहे. यापूर्वी डिचोली पोलीस हे नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या एका प्रकरणात पूजा नाईक हिचे अन्वेषण करत होते. डिचोली पोलिसांकडील पोलीस कोठडीचा पूजा नाईक हिचा कालावधी संपल्यानंतर पर्वरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पूजा नाईक हिला प्रारंभी नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या प्रकरणी म्हार्दाेळ पोलिसांनी कह्यात घेतले होते.
संपादकीय भूमिकावर्ष २०२० मध्ये केलेल्या तक्रारीची त्याच वेळी नोंद न घेणार्या पोलीस अधिकार्यांवर कारवाई का करू नये ? मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पोलीस महासंचालक याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करतील का ? |