उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मैथिली स्वप्नील नाटे ही या पिढीतील एक आहे !
फोंडा (गोवा) येथील कु. मैथिली स्वप्नील नाटे हिचा ३०.१०.२०२४ (आश्विन कृष्ण त्रयोदशी) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(वर्ष २०२४ मध्ये कु. मैथिली स्वप्नील नाटे हिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे. – संकलक)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कु. मैथिली स्वप्नील नाटे हिला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. चांगली स्मरणशक्ती
‘मैथिलीला श्लोक आणि स्तोत्रे लवकर पाठ होतात. तिला रामरक्षा, मारुतिस्तोत्र, कृष्णाष्टक इत्यादी स्तोत्रे पाठ आहेत.
२. सहनशील
एकदा आम्ही विवाह समारंभासाठी गावी गेलो होतो. त्या वेळी माझ्या चुकीमुळे मैथिलीच्या पायावर गरम खीर पडली आणि तिचा पाय भाजला गेला. तिला अतिशय वेदना होत होत्या; पण तिने चिडचिड केली नाही किंवा मला दोषही दिला नाही. ‘मैथिली पूर्वीपेक्षा मनाने स्थिर झाली आहे’, असे जाणवते.
३. चित्रकला, तसेच वस्तूंपासून वेगवेगळ्या गोष्टी सिद्ध करण्याची आवड
मैथिलीला चित्रकला, तसेच विविध वस्तूंपासून वेगवेगळ्या गोष्टी सिद्ध करण्याची आवड आहे. एकदा शाळेमध्ये फुलांपासून रांगोळी सिद्ध करण्याची स्पर्धा होती. त्यामध्ये तिला दुसरे पारितोषिक मिळाले.
४. प्रेमभाव
कु. मैथिली मनाने अत्यंत निर्मळ आहे. तिचे सर्वांशीच वागणे आणि बोलणे आपुलकीचे असते; परंतु ती कधीच कुठल्याही गोष्टींत, व्यक्तींत किंवा प्रसंगांत अडकत नाही.
५. देवता, संत आणि गुरु यांच्याप्रती भाव असणे
देवतांची चित्रे काढतांना देवताच तिला ‘त्यांचा अवयव कसा काढायचा ?’, हे सुचवतात. ‘दैवी बालकांच्या सत्संगात एखादी आसंदी किंवा जागा रिकामी असते, त्या वेळी प्रत्यक्ष परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) बसले आहेत’, असा तिचा भाव असतो. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीत गेल्यावर तिला तिथे पुष्कळ शांत वाटते आणि ‘तिथे नामजप चांगला होतो’, असे ती सांगते.
– सौ. ऋतुजा नाटे (मैथिलीची आई), फोंडा, गोवा. (६.१०.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.