सिंचन घोटाळा चौकशीच्या धारिकेवर दिवंगत आर्.आर्. पाटील यांची स्वाक्षरी होती !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रचारादरम्यान वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार

तासगाव (जिल्हा सांगली), २९ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजपने आरोप केलेल्या ७० सहस्र कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर्.आर. पाटील यांच्यावर फोडले आहे. ‘त्या वेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि चौकशी करण्याची धारिका (फाईल) सिद्ध करण्यात आली. त्या धारिकेवर आर्.आर्. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. हा केसाने गळा कापण्यासारखा प्रकार आहे’, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी येथे केले. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विधानसभेचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले. त्या वेळी त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

मंत्री अजित पवार म्हणाले की, मला अपर्कीत करण्याचा प्रयत्न झाला. इतक्या वर्षांत केवळ ४२ सहस्र कोटी रुपयांची कामे झाली होती, तरीही माझ्यावर ७० सहस्र कोटी रुपयांचा आरोप झाला. माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न झाला.

दिवंगत आर्.आर्. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील म्हणाले की, अजित पवार यांनी आर्.आर्. पाटील यांच्यावर केलेली टीका आमच्यासाठी दु:खद आहे. त्यांना जाऊन ९ वर्षे झालेली आहेत. एखादा घोटाळा आपण केला नसेल, तर घाबरण्याचे कारण नाही. अजित पवार यांनी या केलेल्या टीकेतून सिद्ध काय होणार होते ? याची मला कल्पना नाही. आर्.आर्. पाटील हयात असते, तर त्यांनी उत्तर दिले असते !