‘१८.७.२०२४ या दिवशी मुंबईत रहाणारा माझा मुलगा जयेश राणे याचे आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय ४१ वर्षे होते. शेवटच्या आजारपणात जयेशने केलेले साधनेचे प्रयत्न, त्याच्या कुटुंबियांनी केलेले नामजपादी उपाय आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी राणे कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयीची सूत्रे या लेखात दिली आहेत.
१. तपासण्या केल्यानंतर मुलाचे ‘क्रिएटिनिनचे प्रमाण वाढले असून त्याच्या मूत्रपिंडांचे कार्य २५ टक्केच चालू आहे’, असे निदान होणे
२८.६.२०२४ या दिवशी सायंकाळी जयेशला बरे वाटत नसल्याने आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो. त्याला जुलाब होत होते. आधुनिक वैद्यांनी त्याच्या मूत्रपिडांची कार्यक्षमता न्यून झाल्याचे सांगितले. जयेशच्या काही तपासण्या केल्यानंतर ‘त्याचे क्रिएटिनिनचे प्रमाण ४.५ मिलीग्रॅम प्रती डेसिलीटर आहे’, असे दिसून आले. (निरोगी मूत्रपिंड असलेल्या पुरुषांतील क्रिएटिनिनचे प्रमाण ०.६ ते १.३ मिलीग्रॅम प्रती डेसिलीटर असते.) त्या वेळी जयेशची मूत्रपिंडे केवळ २५ टक्के कार्य करत होती. त्याच्या लघवीचे प्रमाणही अल्प झाले होते.
२. ‘औषधोपचार, तसेच सनातनचे सद्गुरु आणि संत यांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांमुळे मुलाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होणे
जयेशचे शारीरिक त्रास दूर होण्यासाठी आम्ही सनातनचे सद्गुरु आणि संत यांनी सांगितलेले नामजपादी उपाय अन् भावजागृतीचे प्रयोग करत होतो. आठ दिवसांनी गुरुकृपेने जयेशची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला रुग्णालयातून घरी आणण्यात आले. घरी तो आनंदी आणि स्थिर होता. त्याचे व्यष्टी साधनेचे प्रयत्नही चालू होते. त्याने काही आवडते पदार्थ बनवायला सांगून ते आनंदाने ग्रहण केले.
३. ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना त्रास होऊ नये’, असा विचार करून मुलाने रुग्णाईत असतांनाही साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणे
‘आपल्यामुळे गुरुदेवांना त्रास होत आहे’, असे जयेशला सतत वाटायचे. ‘आपण आपली साधना नियमितपणे आणि चिकाटीने केली पाहिजे’, असे तो नेहमी म्हणत असे. जयेश संतांनी सांगितलेले नामजप आणि साधनेचे प्रयत्न नियमित करत असे. ‘आपला वेळ कुठेही वाया जाऊ नये’, याची तो काळजी घेत होता. त्याने रुग्णालयातून घरी आल्यानंतरही साधनेचे प्रयत्न गांभीर्याने केले.
४. लहान भाऊ विशाल यांनी नामजप आणि भावजागृतीचे प्रयोग करणे
दहाव्या दिवशी जयेशला पुन्हा ताप आला आणि अशक्तपणा जाणवू लागला. आम्ही त्याला पुन्हा रुग्णालयात भरती केले. त्या रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याचे शरीर रुग्णालयातील कोणत्याच उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. रुग्णालयात जयेशचा लहान भाऊ विशाल त्याच्या समवेत होता. जयेश अतीदक्षता विभागात असतांना विशालने भावपूर्ण नामजप आणि भावजागृतीचे विविध प्रयोग केले.
‘भगवंतच या कठीण प्रसंगात आम्हाला बळ देत आहे’, याची मला पदोपदी जाणीव होत होती. साधनेच्या प्रयत्नांमुळे जयेशचे मन स्थिर रहायला साहाय्य झाले.
५. सद्गुरु, साधक आणि नातेवाईक यांनी केलेले साहाय्य
५ अ. जयेश यांना नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर ! : जयेशच्या आजारपणात नामजपादी उपाय पूर्ण करण्यासाठी गुरुदेव मला शक्ती देऊन स्थिर ठेवत होते. जयेशची स्थिती गंभीर झाल्याचे कळल्यानंतर मी सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांना संपर्क केला. त्या वेळी त्यांनी नामजप करण्यास सांगितला. नंतर सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनीही तोच नामजप करण्यास सांगितला. जयेशला आध्यात्मिक लाभ व्हावा, यासाठी सद्गुरु अनुराधा वाडेकर ४ साधकांना नामजप करण्यास सांगितले होते. त्या वेळी ‘गुरुदेव आपल्याला आवश्यक ती ऊर्जा पुरवतात’, याची जाणीव होऊन माझी भावजागृती झाली.
५ आ. ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शालिनी सावंत यांनी आधार देणे : या काळात आमच्या नातेवाईक आणि सनातनच्या साधिका सौ. शालिनी सावंत (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७० वर्षे) यांनी मला रामनाथी, गोवा येथील आश्रमातून संपर्क केला. त्यांनी ‘गुरुदेवांची कृपा कशी असते ? जीवनातील प्रतिकूल प्रसंगांत भगवंत आपल्याला कसे स्थिर ठेवतो ?’, यांविषयी आम्हाला सांगितले. त्यांनी मला ‘गुरुदेवांनी जयेशला मांडीवर घेतले आहे. त्यामुळे जयेशवर उपाय होत आहेत’, अशा स्वरूपाचे २ भावप्रयोग करायलाही सांगितले.
६. मुलाच्या गंभीर आजारपणात साधिकेने केलेले भावजागृतीचे प्रयत्न
गुरुकृपेने या प्रतिकूल प्रसंगात मला स्थिर राहून साधनेचे प्रयत्न करता आले.
अ. मी दिवसभर सांगितलेला नामजप भावपूर्ण रितीने करत होते. गुरुदेवांनी जयेशला याआधीही अनेक गंभीर आजारपणातून जीवनदान दिले आहे आणि फुलासारखे सांभाळले आहे. ‘या प्रसंगात गुरुदेव आम्हाला सकारात्मक राहून आजाराला सामोरे जाण्याचे बळ देत आहेत’, याची जाणीव होऊन माझी वारंवार भावजागृती होत होती.
आ. मी गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलत असे आणि त्यातून मला ऊर्जा मिळत असे.
७. मुलाच्या फुप्फुसांमध्ये जंतूसंसर्ग होऊन त्याची स्थिती अधिक गंभीर होणे आणि गुरुवारी त्याचे देहावसान होणे
या काळात जयेशला ‘न्यूमोनिया’ झाल्याचे निदान झाले. त्याच्या फुप्फुसांत जंतूसंसर्ग झाला होता. त्यामुळे जयेशची स्थिती अधिकच गंभीर होत गेली. १५.७.२०२४ पासून आधुनिक वैद्यांनी ‘आता परमेश्वरावरच सर्व भरवसा आहे’, असे आम्हाला सांगितले.
आम्ही सर्वजण जयेशसाठी सतत प्रार्थना करत होतो. गुरुवार, १८.७.२०२४ या दिवशी भक्तीसत्संग चालू असतांना दुपारी ३.२३ वाजता जयेशचे निधन झाले.
८. जयेशचे पार्थिव घरी आणल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. पार्थिवाकडे पाहिल्यावर ‘जयेश शांत झोपला आहे’, असे वाटत होते. तो तेजस्वी दिसत होता.
आ. ‘मी शोक केलेला गुरुदेवांना आवडणार नाही’, याची मला जाणीव झाली. ‘जयेश रुग्णाईत असतांनाही गुरुदेवांनी त्याच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करून घेतली अन् त्याला सतत सकारात्मक ठेवले’, याचे मला स्मरण झाले. त्यामुळे मला स्थिर रहाता आले.
‘गुरुदेव, आमचे प्रारब्ध कठीण असूनही आपण जयेशकडून साधना करून घेतली आणि आम्हालाही जिवापलीकडे जपले. या काळात आम्हाला स्थिर आणि निर्विकल्प ठेवले. यासाठी आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही अल्पच आहे.’
– सौ. शुभदा श्रीकांत राणे (कै. जयेश यांची आई, वय ६३ वर्षे), भांडुप, मुंबई. (१४.९.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |