Expenditure On Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून दरपत्रक घोषित !

  • ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा

  • अधिक खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उमेदवारांवर कारवाई होणार

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना विविध स्वरूपाचे दरपत्रक ठरवून दिले आहे. निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा २८ लाख रुपयांंची होती. यापेक्षा अधिक खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे. बैठका, सभा, रॅली, जाहिरात पत्रक, वाहन यांच्या खर्चाचा यात समावेश आहे.

१. प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांचे दर ठरवण्यात आले आहेत. दुचाकी एक दिवसासाठी १ सहस्र १०० रुपये, रिक्शा १ सहस्र ३०० रुपये, हलके वाहन ३ सहस्र ३०० रुपये, मध्यम वाहन ३ सहस्र ९००, उच्च दर्जाचे वाहन ५ सहस्र १०० रुपये, असा दर ठरवण्यात आला आहे.


२. बँडपथकात २० माणसांसाठी प्रतिदिन १ सहस्र रुपये, ५ माणसांचे पोवाडा पथक ५ सहस्र रुपये, ३ माणसांचे हलगी पथक १ सहस्र ५०० रुपये, २० जणांचे झांजपथक १० सहस्र रुपये, शिंगवादन प्रतिव्यक्ती ३०० रुपये, बँजो ग्रुप ४ माणसांसाठी ३-४ घंट्यांंसाठी २ सहस्र ५०० रुपये, मोठा पुष्पगुच्छ २२० रुपये, मध्यम पुष्पगुच्छ १८० रुपये, लहान पुष्पगुच्छ १०० रुपये, मोठा हार ३२५, मध्यम २३५ रुपये, तर लहान १२५ रुपये, असा दर ठरवण्यात आला आहे.

३. चहा ८ रुपये, कॉफी १२ रुपये, बिस्किटचा पुडा १० रुपये, शीतपेय २० रुपये, कोकम सरबत, लस्सी, पोहे, उपीट, शिरा प्रत्येकी १५ रुपये, वडापाव १० रुपये, इडली २५ रुपये, मिसळ ४९ रुपये, समोसा १५ रुपये, शाकाहारी जेवण ७० रुपये, मांसाहारी जेवण १२० रुपये, असे खाद्यपदार्थांचे दरपत्रक आहे. प्रचार खर्चासाठी अशा एकूण २५२ पदार्थांच्या दराची सूची घोषित करण्यात आली आहे.