PM Modi At BRICS : भारत युद्धाला नाही, तर संवाद आणि मुत्‍सद्देगिरी यांना पाठिंबा देतो !

ब्रिक्‍स परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी मांडली भारताची भूमिका  

कझान (रशिया) – भारत युद्धाला नव्‍हे, तर संवाद आणि मुत्‍सद्देगिरी यांना पाठिंबा देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित ‘ब्रिक्‍स’ (ब्राझिल, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारत या देशांची संघटना) परिषदेत सांगितले. ‘रशिया-युक्रेन संघर्ष शांततापूर्ण वाटाघाटीतून सोडवावा’, असा स्‍पष्‍ट संदेश त्‍यांनी दिला. या परिषदेत रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांच्‍यासह ब्रिक्‍स देशांचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.

पंतप्रधान मोदी म्‍हणाले की,

१. ज्‍याप्रमाणे आपण कोरोना महामारीसारख्‍या आव्‍हानांवर एकत्रितपणे मात करू शकलो आहोत, त्‍याचप्रमाणे भविष्‍यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, सशक्‍त आणि समृद्ध भविष्‍य सुनिश्‍चित करण्‍यासाठी आपण नवीन संधी निर्माण करण्‍यात नक्‍कीच सक्षम आहोत.

२. आतंकवाद आणि त्‍याला होणारा अर्थपुरवठा यांचा सामना करण्‍यासाठी आम्‍हाला सर्वांच्‍या एकत्रित आणि खंबीर पाठिंब्‍याची आवश्‍यकता आहे. या गंभीर प्रकरणात दुटप्‍पीपणाला जागा नाही. आपल्‍या देशांतील तरुणांमधील कट्टरता रोखण्‍यासाठी आपण सक्रीय पावले उचलण्‍याची आवश्‍यकता आहे.

३. संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय आतंकवादावरील व्‍यापक अधिवेशनाच्‍या प्रदीर्घ प्रलंबित सूत्रांवर आपण एकत्र काम केले पाहिजे. त्‍याचप्रमाणे आम्‍हाला सायबर सुरक्षा आणि सुरक्षित कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी जागतिक नियमांवर काम करणे आवश्‍यक आहे.

४. युनायटेड नेशन्‍स सिक्‍युरिटी कौन्‍सिल, बहुपक्षीय विकास बँका आणि जागतिक व्‍यापार संघटना यांसारख्‍या जागतिक संस्‍थांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी आपण वेळेवर पुढे जाणे आवश्‍यक आहे. ब्रिक्‍समध्‍ये आम्‍ही आमचे प्रयत्न पुढे नेत असतांना ही संघटना जागतिक संस्‍थांची जागा घेऊ पहाणार्‍या संस्‍थेची प्रतिमा विकसित करणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

ब्रिक्‍समध्‍ये नवीन देशांचे स्‍वागत करण्‍यास भारत सज्‍ज !

पंतप्रधान म्‍हणाले की, भारत ब्रिक्‍समध्‍ये भागीदार देश म्‍हणून नवीन देशांचे स्‍वागत करण्‍यास सिद्ध आहे. या संदर्भात सर्व निर्णय एकमताने घेतले पाहिजेत आणि ब्रिक्‍सच्‍या संस्‍थापक सदस्‍यांच्‍या विचारांचा आदर केला पाहिजे. जोहान्‍सबर्ग शिखर परिषदेमध्‍ये  स्‍वीकारण्‍यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे, मानके, निकष आणि प्रक्रिया सर्व सदस्‍य आणि भागीदार देशांनी पाळल्‍या पाहिजेत.

पुतिन यांनी मोदी यांना गमतीने म्‍हटले, ‘आमच्‍या संबंधांसाठी दुभाष्‍यांची आवश्‍यकता नाही !’  


ब्रिक्‍स परिषदेपूर्वी भारत आणि रशिया यांच्‍यात द्विपक्षीय बैठक झाली. या वेळी  रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांना गमतीने म्‍हटलेे, ‘आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि तुम्‍ही दुभाष्‍याविना आमचे संभाषण समजून घेता.’ यानंतर मोदी आणि पुतिन जोरजोरात हसू लागले.

मोदी-जिनपिंग यांच्‍यात झाली द्विपक्षीय चर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांच्‍यात द्विपक्षीय चर्चा करण्‍यात आली. जवळपास ५० मिनिटे या दोघांमध्‍ये चर्चा झाली. या वेळी भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर, राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसेच दोन्‍ही देशांचे अधिकारी उपस्‍थित होते. यात अनेक सूत्रांवर चर्चा करण्‍यात आली. यात नेमके काय ठरले, ते अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. जवळपास ५ वर्षांनंतर या दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये ही औपचारिक चर्चा झाली. वर्ष २०२० मध्‍ये गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्‍यामधील संबंधांमध्‍ये तणाव निर्माण झाला होता.