बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकार आणि सीमा सुरक्षा दल यांच्यावर फुकाचा आरोप
कोलकाता (बंगाल) – बांगलादेशाला लागून असलेल्या सीमेचे रक्षण करणारे सीमा सुरक्षा दल विविध भागांतून बंगालमध्ये घुसखोरीला अनुमती देत आहे. बांगलादेशी आतंकवादी बंगालमध्ये येत आहेत. हा केंद्राचा डाव आहे. बंगाल अस्थिर करण्याचा कट आहे, असा आरोप बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे असणारे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की, शेजारील देशात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या संदर्भात राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला जाब विचारायला हवा. प्रत्येक प्रकरणात तृणमूल काँग्रेस सरकारची चूक शोधणारे आणि आंदोलने करणारे राज्यातील भाजपचे नेते बांगलादेशातील हिंदू अन् इतर समुदाय यांच्यावर चालू असलेल्या अत्याचारांबद्दल, तसेच केंद्र सरकारच्या थंड प्रतिसादाबद्दल बोलत नाहीत. बांगलादेशातील परिस्थितीवर तृणमूल काँग्रेस आणि राज्य सरकार केंद्राने घेतलेल्या निर्णयाचे पालन करतील.
संपादकीय भूमिकामुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात पुरावे देणे आवश्यक आहे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील, तर जनता त्यावरून सरकार आणि सीमा सुरक्षा दल यांना जाब विचारेल; मात्र बांगलादेशी घुसखोरांना बंगालमध्ये मुक्तपणे वावरू देणार्या ममता बॅनर्जी यांच्या या आरोपांकडे कुणी गांभीर्याने पाहील, असे वाटत नाही ! |