‘ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर तेथील स्वच्छता कर्मचार्याने लैंगिक अत्याचार केले. हे वृत्त उघडकीस आले आणि यानंतर ‘सत्तेचे दलाल’ असणार्या पक्षांनी केवळ विरोधासाठी म्हणून ‘रेल्वे रोको’ आंदोलन करून सामान्य जनतेस वेठीस धरले. अत्याचार झालेली शाळा बदलापूरातील प्रसिद्ध शाळा असून तिच्या कार्यकारिणीवरील संचालक हे ‘मोठ्या पक्षाचे’ कार्य करतात.
१. सत्तेचे दलाल आणि विरोधी पक्ष कुठे असतात ?
आंदोलन करणार्या ‘सत्तेच्या दलालां’ना विचारावेसे वाटते की, केवळ हेच प्रकरण एवढे गंभीर करून त्याला राजकीय रंग देण्याचे कारण काय ? यापूर्वी उरण (जिल्हा रायगड) येथेही एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका मुलीचे अपहरण करण्यात आले होते. इतर धर्मातील लोकांनी तिची अमानुष हत्या केली होती. तेव्हा हे ‘सत्तेचे दलाल’ शांत का बसले ? ‘त्या वेळी सत्तेच्या दलालांना आंदोलन आणि अन्य आंदोलन करावे’, असे का वाटले नाही ?
त्यानंतर कोलकाता (बंगाल) येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका डॉक्टर विद्यार्थिनीवर ‘अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली’, हेही प्रकरण पुष्कळ गंभीर आहे. या महाविद्यालयात मृत महिलांवर अत्याचार करून ‘अश्लील (पॉर्न) चित्रफीत बनवली जात होती. मृत व्यक्तींचे चांगले अवयव काढून विकले जात होते. त्याचा सुगावा त्या विद्यार्थिनीला लागला होता; म्हणून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मग या प्रकरणात सर्व विरोधी पक्ष शांत का ? त्या वेळी आंदोलन, बंद पुकारणे, तसेच प्रसारमाध्यमांवर चर्चा यांत ते कुठे होते ? ममता बॅनर्जी यांनी अशी कोणती जादूची कांडी फिरवली होती ?
या ‘सत्तेच्या दलालांना’ एकच सांगणे आहे की, असले ‘गलिच्छ राजकारण’ तात्काळ बंद करून जनतेच्या हितासाठी काहीतरी करा. आजही दिवंगत अभिनेते सुशांत राजपूत यांच्या स्वीय साहाय्यक दिशा सालीयन हिच्या हत्या प्रकरणाचा काहीच निकाल लागलेला नाही. त्यातील आरोपी मोकाटच आहेत. (त्यांना कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का ?) त्या वेळी बंद आणि आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही.
२. बलात्कार आणि अपप्रकार रोखण्यासाठीचे उपाय
अशा हत्या रोखण्यासाठी कठोर उपाय, म्हणजे आरोपींना तात्काळ फाशी देणे, ही एकच शिक्षा योग्य आहे. प्रसारमाध्यमांवर प्रदर्शित होणार्या अत्यंत अश्लील ‘वेब सिरीज’ तसेच तमिळ, तेलुगू आणि मल्याळम् चित्रपटांमधून दाखवला जाणारा देहाचा बाजार बंद केला पाहिजे. पुरुषांच्या भावना उद्दिपित करणार्या ‘वेब सिरीज’ आणि चित्रपट यांवर बंदी आणावी. खरे म्हणजे सरकारने केंद्रीय प्रमाणपत्र देण्याची पद्धत आहे; पण त्यातही भ्रष्टाचार पसरला आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणी संच यांवर चांगले संस्कार करणार्या मालिका प्रदर्शित झाल्या पाहिजेत, तसेच घरोघरी धर्मशिक्षण दिले पाहिजे. भ्रमणभाषवर प्रदर्शित होणार्या अश्लील चित्रफिती आणि अश्लील (पॉर्न) चित्रपट बंद केले, तरच समाजाची अधोगती होणार नाही. राजकीय पक्षांनीही सामान्य जनतेसाठी चांगल्यात चांगले काय करता येईल, याचा विचार करावा. बदलापूर, उरण, कोलकाता, हुबळी, तसेच दिशा सालियन यांसारख्या प्रकरणांतील पीडितांना कसा न्याय मिळवून देता येईल, याचा विचार करावा.’
– श्री. गुरुदास कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा.