हिंदु धर्माची व्‍याप्‍ती ! 

महान हिंदु धर्माचे स्‍वरूप विशद करणारी लेखमाला !

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/862318.html

५ ऊ. याज्ञवल्‍क्‍यस्‍मृती आणि गीता धर्माचा हाच अर्थ प्रतिपादन करतात. भगवान श्रीकृष्‍ण सांगतात,

स्‍वे स्‍वे कर्मण्‍यभिरतः संसिद्धिं लभते नरः । 
स्‍वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्‍दति तच्‍छृणु ॥ 

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय १८, श्‍लोक ४५

अर्थ : आपापल्‍या स्‍वाभाविक कर्मांत तत्‍पर असलेल्‍या मनुष्‍यास भगवत्‍प्राप्‍तीरूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्‍या स्‍वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्‍य ज्‍या रितीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्‍त होतो, ती रित तू ऐक.

‘धर्म’ संज्ञेचा अर्थ अत्‍यंत व्‍यापक आहे. तो ‘रिलिजन’प्रमाणे संकुचित नाही. ‘रिलिजन’ हा शब्‍द मूळ लॅटिन ‘रेलिजिओ’, म्‍हणजे ‘आब्‍लीगेशन’, ‘बाँड’, ‘रेव्‍हरन्‍स’ यावरून आला आहे.

विद्यावाचस्‍पति शंकर वासुदेव अभ्‍यंकर

‘ऑक्‍सफर्ड’ शब्‍दकोशात धर्माचे ४ अर्थ दिलेले आहेत.  

१. अतिमानवी नियंत्रण शक्‍तीवरील विश्‍वास, विशेषतः आज्ञाधारकता आणि उपासना यांच्‍यासाठी असलेला देवांचा देव

२. उपासनेत याची अभिव्‍यक्‍ती

३. विश्‍वास आणि उपासना यांची एक विशिष्‍ट पद्धत

४. मठातील प्रतिज्ञेनुरूप जीवन (धर्माचा मार्ग).

५ ऊ १.‘रिडर्स डायजेस्‍ट’च्‍या धर्माच्‍या सूचीत हिंदु धर्माचा उल्लेख नसणे : ‘रिडर्स डायजेस्‍ट’ मासिकाने प्रकाशित केलेल्‍या शब्‍दकोशात धर्माची उदाहरणे देतांना ख्रिस्‍ती, इस्‍लाम, बहाई, जैन, बौद्ध, शिन्‍तो आणि शीख इत्‍यादी सर्वांचा उल्लेख केला आहे; पण त्‍या सूचीत हिंदु धर्माचा उल्लेखही नाही. हे अज्ञान कि अप्रबुद्धता ? धृष्‍टता कि दुष्‍टता ? हिंदूंनी संघटितपणे याचा तीव्र निषेध केला पाहिजे. धर्म संकल्‍पनेत मानवी जीवनाची इहलौकिक आणि पारलौकिक एकात्‍मता आहे. ‘धर्म’ या संज्ञेत ती नाही.

याज्ञवल्‍क्‍य म्‍हणतात,

‘पुराणन्‍यायमीमांसाधर्मशास्‍त्राङ्गमिश्रिताः । 
वेदाः स्‍थानानि विद्यानां धर्मस्‍य च चतुर्दश ॥ 

– याज्ञवल्‍क्‍यस्‍मृति, आचाराध्‍याय, प्रकरण १, श्‍लोक ३

अर्थ : पुराणे, न्‍याय, मीमांसा, धर्मशास्‍त्र, (शिक्षा, कल्‍प, व्‍याकरण, निरुक्‍त, छंद आणि ज्‍योतिष ही) ६ वेदांगे आणि ४ वेद हे सर्व मिळून १४ विद्यांचे अन् धर्माचे अधिष्‍ठान आहेत. (हाच श्‍लोक शिव पुराण १.१५, विष्‍णु पुराण ३.६.२८, गणेश पुराण १.९३.३.४, भविष्‍य पुराण २.६ आणि विष्‍णुधर्मोत्तर पुराण १.७४.३३ इत्‍यादी स्‍थळी आला आहे.)’

५ ए. छांदोग्‍योपनिषद : यांत ‘४ आश्रमांची विशिष्‍ट कर्तव्‍ये’, या अर्थाने धर्म शब्‍द आलेला आहे. तो मंत्र असा –

त्रयो धर्मस्‍कन्‍धा यज्ञोऽध्‍ययनं दानमिति प्रथमस्‍तप एव द्वितीयो ब्रह्मचार्याचार्यकुलवासी तृतीयाऽत्‍यन्‍तमात्‍मानमाचार्यकुलेऽवसायदन् सर्व एते पुण्‍यलोका भवन्‍ति ब्रह्मसस्‍थोऽमृतत्‍वमेतिः ॥ 

– छान्‍दोग्‍योपनिषद़्, अध्‍याय २, खंड २३, वाक्‍य १

अर्थ : धर्माचे ३ स्‍कंध (शाखा) आहेत.

१. यज्ञ, अध्‍ययन आणि दान हा पहिला स्‍कंध (यात ‘गृहस्‍थाश्रमा’चा समावेश होतो).

२. उग्र तपश्‍चर्या हा दुसरा स्‍कंध (यात ‘वानप्रस्‍थाश्रम’ सूचित होतो).

३. आचार्य कुलात रहाणारा ब्रह्मचारी आणि आपल्‍या गुरूंच्‍या कुटुंबात स्‍वतः शेवटपर्यंत वास्‍तव्‍य करणारा हा तृतीय स्‍कंध होय. (यात ‘ब्रह्मचर्याश्रम’ सूचित होतो.)

पुण्‍यवान माणसांना जे लोक प्राप्‍त होतात, त्‍या लोकात हे सर्व पुरुष जातात आणि जो ब्रह्मामध्‍ये दृढपणे वास करतो, तो अमरत्‍व पावतो.’

– विद्यावाचस्‍पति शंकर वासुदेव अभ्‍यंकर

(क्रमशः)

(साभार : ‘हिंदु धर्म संस्‍कृती ग्रंथमाला १’, ‘हिंदु धर्माचे स्‍वरूप’ या ग्रंथातून)